पुणे : कात्रज परिसरात दराेडा टाकण्याच्या तयारीत असलेला चुहा गँगचा म्होरक्या ताैसिफ उर्फ चुहा आणि त्याच्या चार साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात भारती विद्यापीठ पाेलिसांना यश आले आहे.
ताैसिफ ऊर्फ चुहा जमिर सय्यद, अझरुद्दीन दिलावर शेख (वय २२), ईशान निसार शेख (२०), गणेश विजय भंडलकर (२१) व कैफ आरीफ शेख (१८, सर्व रा. कात्रज, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.
चुहा गँगने कात्रज परिसरात दहशत पसरविली आहे. सामान्य नागरिकांना त्रास देणे, व्यावसायिकांकडून खंडणी, जबरी चोरी आणि खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे या टोळीतील सदस्यांवर आहेत. गँगचा सुत्रधार ताैसिफ हा त्याच्या साथीदारांसह साेमवारी संध्याकाळी कात्रज परिसरातील पतंगराव कदम बंगल्याच्या समोरील सच्चाई माता डोंगरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी चुहा गँग तिथेच तळ ठोकून होती. त्या सगळ्यांना पोलिसांनी अटक करत त्यांच्या ताब्यातून दाेन काेयते, मिरची पुड, लाेखंडी राॅड, माेबाईल असा मुद्देमाल जप्त केला. यापूर्वी टोळीतील या सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
हेही वाचा : कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपद विदर्भाकडे