ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बारावी गणिताच्या पेपर फुटीप्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. बुलढाण्यात पेपर फुटीसाठी हॉट्सॲप ग्रुपचा वापर झाला असून, त्याचे मुंबई कनेक्शन पुढे आले आहे. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी दोन शिक्षकांसह 5 जणांना अटक केली आहे. पेपर सुरु होण्याचा अर्धा तासापूर्वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
बारावी गणिताच्या बोर्डातील प्रश्नपत्रिकेची दोन पाने सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली होती. मात्र, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आले नव्हते. यामुळे हा पेपर पुन्हा घेतला जाणार नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केलं होतं. मात्र, आता मुंबईतील डॉ. अँथोनी डिसिल्वा हायस्कूलमधील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये 10 वाजून 17 मिनिटांनी गणिताच्या पेपरची काही पाने आढळल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह दोन खासगी शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हॉट्सॲप ग्रुप बनवून त्यामध्ये पेपर लीक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या व्हॉट्सॲप गुपमध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक तसेच काही इतर व्यक्ती होत्या. पेपर फुटी प्रकरणानंतर हा गुप डिलिट करण्यात आला असून, सायबर पोलीस तो गुप आता रिकव्हर करुन त्यामधील डेटा तपासणार आहेत. पेपर लीकशिवाय परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतल्याची माहितीही समोर आली आहे.