पुणे / वार्ताहर :
हवेली तालुक्यातील गोऱ्हे बुद्रुक येथे एका टोळक्यास मोटारसायकल हळू चालविण्यास सांगितल्याच्या कारणावरुन तब्बल दहाजणांनी कोयत्याचा धाक दाखवून रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ व दमदाटी करत दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. रविवारी सायंकाळी ही घटना घडली होती. याप्रकरणातील पाच आरोपींना हवेली पोलिसांनी अटक केली आहे.
निलेश साह (वय-23), अक्षय सुरेश चव्हाण (23), सागर कांतु पाटील (22), अनिकेत विनायक भोर (22) यांच्यासह एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर नचिकेत संजय जगताप, सूरज जालिंदर ठाकूर, पंकज दिलीप चव्हाण, अक्षय चव्हाण, अनुप शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता नितीन तनपुरे यांनी या आरोपींविरोधात तक्रार दिली आहे. या सर्व आरोपींवर यापूर्वी खूनाचा प्रयत्न, मारहाण करणे, खंडणी मागणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्हयात वापरलेला एक कोयता जप्त करण्यात आला आहे.
गोऱ्हे बुद्रुक येथे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपींना रस्त्यावरून गाडी हळू चालविण्यास सांगितल्याच्या कारणावरुन तक्रारदार तनपुरे व त्यांच्या पतींना आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच तनपुरे यांचा भाऊ अक्षय नानगुडे यास जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या आईला मारहाण केली होती. त्यानंतर या टोळक्यात परिसरात कोयते घेऊन दहशत माजवली होती.