Tarun Bharat

पाणी बिलात 5 टक्के वाढ

Advertisements

ऐन नवरात्रोत्सवात सरकारचा जनतेला धक्का : सहा महिन्यांनंतर पुन्हा होणार आहे दरवाढ,प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी होणार दरवाढ,घोषणा मोफतची, निर्णय मात्र दरवाढीचा

प्रतिनिधी /पणजी

महागाईने त्रस्त झालेल्या गोमंतकीय जनतेला आता याच चालू ऑक्टोबर महिन्यापासून पाणी दरवाढीचे चटके आणि धक्के सहन करावे लागणार असून राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने 1 ऑक्टोबरपासून सर्व वर्गातील ग्राहकांसाठी 5 टक्के दरवाढ जारी केली आहे. आधिच जनतेला नळावाटे पुरेसे पाणी मिळत नाही आणि त्यात ही दरवाढ झाल्यामुळे जनतेच्या तोंडचे पाणीच पळाल्यासारखी स्थिती होणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पाणी दरवाढ करण्याचे सरकरने ठरवल्याने पुन्हा सहा महिन्यांनी म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून पाणी दरवाढ करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

या दरवाढीचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत असून कोणतीही पूर्वसूचना किंवा कल्पना न देता अचानक दरवाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून येणारी पाण्याची बिले वाढणार असून विरोधी पक्षांसह जनतेने आवाज उठवल्याशिवाय ती दरवाढ मागे घेतली जाणार नाही असे एकंदरीत चित्र आहे.

प्रत्येक आर्थिक वर्षारंभी होणार दरवाढ

खात्याने यासंदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेनुसार दरवर्षी पाणी दरात वाढ करण्यात येणार आहे. असे यापूर्वी कधी ठरवण्यात आले नव्हते. मग आताच तसा निर्णय कसा काय व कोणी घेतला? अशी चर्चा जनतेत सुरू झाली आहे.

घरगुती ग्राहकांना दरवाढीतून वगळावे

नळाला पुरेसे पाणी येत नाही आणि त्याची बिले मात्र भरपूर येतात अशा जनतेच्या तक्रारी असून आता तर पाण्याची बिले किती वाढून येतील ते नंतरच कळणार आहे. घरगुती ग्राहकांना या दरवाढीतून वगळण्याची मागणी पुढे येत असून विरोधी पक्षांसह जनतेने आवाज केला तर सरकारला नमते घ्यावे लागेल असे मत जनमानसात दिसून येत आहे.

सोळा युनिट मोफत पाणी कुठे गेले?

विधानसभा निवडणुकीपूर्वी 16 युनिट मोफत पाणी देण्याची घोषणा भाजपने केली होती. त्यावर मते मिळवली आणि आता सत्ता मिळाली तशी 5 टक्के दरवाढ केली. ते 16 युनिट मोफत पाणी लोकांना मिळते की नाही कोण जाणे? काँग्रेसचे 8 आमदार फुटल्यानंतर ते भाजपवासी झाल्यानंतर आता विरोधकच नसल्याच्या अविर्भावात पाणी दरवाढ केल्याची टीका सरकारवर होऊ लागली आहे.

दरवर्षी दरवाढ करण्याचा निर्णय सरकारने कसा काय घेतला, हे आश्चर्यकारक असून धक्कादायकही आहे. दरवर्षी पाणी दरवाढ करण्याची खरोखरच गरज आहे काय? असाही प्रश्न जनतेला सतावत असून अशा प्रकारे दरवर्षी दरवाढ केली तर ती जनतेला परवडणार नाही हे एक सत्य आहे. विरोधी पक्षांनी याबाबत आवाज उठवण्यास सुरूवात केली असून जनतेने उठाव केला तरच काहीतरी होऊ शकते नाहीतर भुर्दंड सोसण्याशिवाय पर्याय रहाणार नाही असे दिसून येत आहे. कोणालाच विश्वासात न घेता सदर वाढ केल्याचे दिसून आले आहे.

आमदार फोडण्याच्या खर्चाची ही वसुली : सरदेसाई

राज्यात सरकारने पाणीपट्टीत वाढ केली आहे. त्यावर टीका करताना, जे सरकार आधी लोकांना 16 हजार लिटर पाणी फुकट देण्याच्या बात करत होते तेच सरकार आपले आधीचे आश्वासन पूर्ण न करता आता पाणीपट्टी वाढवत आहे, याकडे आमदार विजय सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे. काँग्रेसचे आठ आमदार फोडण्यासाठी सरकारने जे पैसे खर्च केले ते आता असे लोकांकडून वसूल करण्यात येत आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

 पाणी दरवाढीच्या विरोधात एकत्रितपणे लढुया : आलेमाव

संवेदनाशून्य भाजप सरकारने गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला पाणीदरात 5 टक्के वाढ जाहीर केली हे दुर्दैवी आहे. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांनी आपले जीवन गोरगरीबांना मदत आणि उन्नतीसाठी समर्पित केले. आपण सर्वांनी एकत्र येऊन गरिबांच्या हक्कासाठी लढले पाहिजे. या निर्णयामुळे भाजप सरकारची गोमंतकीयांबद्दलची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. 18 मिनिटांच्या शपथविधी सोहळय़ावर 6 कोटी रुपये खर्च करणाऱया सरकारची तिजोरी रिकामी आहे, हे या दरवाढीच्या निर्णयाने पुन्हा स्पष्ट झाले आहे. सरकारने तात्काळ दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेता युरी आलेमाव यांनी केली आहे.

Related Stories

मांद्रे सप्तेश्वर पा.शि. संघाध्यक्षपदी सेबास्टीना

Amit Kulkarni

डॉ. सोमनाथ कोमरपंत यांच्या छळाचा दावा तथ्यहीन

Amit Kulkarni

भगतसिंह कोश्यारी यांनी स्वीकारली गोव्याच्या राज्यपालपदाची सूत्रे

datta jadhav

फर्मागुडीच्या पठारावर काकडी मळय़ांची लगबग

Amit Kulkarni

हवाला प्रकरणी बाणावलीत छापे

Amit Kulkarni

काणकोणात भटक्या जनावरांची समस्या जटील

Patil_p
error: Content is protected !!