Tarun Bharat

विविध राज्यांमधून 5 दहशतवाद्यांना अटक

Advertisements

स्वातंत्र्यदिनी स्फोट घडविण्याचा होता कट ः आयईडी निर्मितीची सामग्री हस्तगत

वृत्तसंस्था / आझमगड

स्वातंत्र्यदिनापूर्वी स्फोटाचा कट रचणाऱया 5 दहशतवाद्यांना तपास यंत्रणांनी अटक केली आहे. उत्तरप्रदेशात इस्लामिक स्टेटचा एक तर पंजाबमध्ये 2 आणि मध्यप्रदेशात जेएमबीच्या 2 दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे स्वातंत्र्यदिनी होणारा घातपात रोखण्यास सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.

 इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्याला उत्तरप्रदेश एटीएसने आझमगड येथून अटक केली आहे. संशयिताचे नाव सबाउद्दीन आझमी असून तो इस्लामिक स्टेटच्या रिक्रूटरशी थेट संपर्कात होता. उत्तरप्रदेश एटीएसने या संशयिताकडून आयईडी निर्मितीची सामग्री हस्तगत केली आहे.

आरोपीला अटक केल्यावर चौकशीसाठी एटीएस मुख्यालयात नेण्यात आले. मोबाईल डाटा पडताळल्यावर तो इस्लामिक स्टेटकडून ब्रेनवॉश करण्यासाठी तयार करण्यात आलेले टेलिग्राम चॅनेलशी थेट जोडला गेलेला असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सबाउद्दीन हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱयांना लक्ष्य करण्याचा कट आखत होता असे चौकशीतून समोर आले आहे. सोशल मीडिया ऍप्सच्या माध्यमातून त्याला हँडग्रेनेड, बॉम्ब आणि आयईडी निर्मितीचे प्रशिक्षण मिळाले होते.

पंजाबमध्ये दोन दहशतवादी जेरबंद

पंजाबमध्ये स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठय़ा कटाचा पर्दाफाश झाला आहे. तरनतारन येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दारूगोळा, दोन पिस्तूल आणि 500 ग्रॅम हेरॉइन हस्तगत करण्यात आले. हे दोन्ही दहशतवादी स्वातंत्र्यदिनी मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत होते. गुरविंदर सिंह आणि संदीप सिंह अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. गुरविंदर हा एनआयए अधिकाऱयाच्या हत्येप्रकरणी आरोपी आहे.

भोपाळमध्ये 2 दहशतवादी ताब्यात

एनआयएने मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे प्रतिबंधित दहशतवादी संघटना जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशच्या (जेएमबी) दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हमीदुल्ला हुसैन उर्फ राजा गाजी आणि मोहम्मद हुसैन या दहशतवाद्यांकडून एनआयएने आक्षेपार्ह सामग्री हस्तगत केली आहे. यापूर्वी 13 मार्च रोजी जेएमबीच्या 4 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 14 मार्च रोजी आणखी दोन दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात आले होते. बिहारच्या बोधगया येथील बॉम्बस्फोटात जेएमबीचा हात असल्याचे उघड झाल्यावर 2019 मध्ये भारतात या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्यात आली होती.

Related Stories

एक पाऊल मागे घेतले, पण पुन्हा पुढे जाणार!

Patil_p

पुणे-नगर-नाशिक-औरंगाबाद-बीडला निसर्ग झोडपणार

datta jadhav

रॉचा आयएसआयला संदेश अन् अभिनंदन यांची मुक्तता

Amit Kulkarni

कोरोना बळींच्या भरपाईनिधीसंबंधी विचारणा

Patil_p

बारामुल्ला येथील चकमकीत लष्करी अधिकारी जखमी

datta jadhav

कशी होते राष्ट्रपतींची निवड? कोण लढवू शकतं ही निवडणूक…

datta jadhav
error: Content is protected !!