मुख्यमंत्री बोम्माई यांच्याकडून आज डीबीटीमार्फत जमा करण्यास प्रारंभ
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विणकर/विणकाम मजुरांसाठी विणकर सन्मान योजना जारी केली आहे. सदर योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात 5 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. 11 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता मुख्यमंत्र्यांचे गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे बसवराज बोम्माई डीबीटीमार्फत मदत जमा करण्यास प्रारंभ करतील.
कोरोनानंतर आर्थिकदृष्ट्या संकटात असणाऱ्या विणकरांना आणि विणकामाशी संबंधीत मजुरांसाठी विणकर सन्मान योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 2022-23 या वर्षात विणकरांच्या खात्यावर थेट 5 हजार रुपये अर्थसाहाय्य जमा केले जाणार आहेत. वस्त्राsद्योग खात्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार आतापर्यंत नोंदणी केलेल्या 1,02,980 विणकर/मजुरांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
2020-21 या वर्षात कोरोनामुळे संकटात असलेल्या 51,862 हातमाग/यंत्रमागधारक विणकरांना प्रत्येकी 2 हजार रुपये मदत देण्यात आली होती. 2021-22 या वर्षात 85,718 विणकरांना प्रत्येकी 3 हजार रुपयेप्रमाणे 25.71 कोटी रुपये मदत देण्यात आली होती.