Tarun Bharat

50 वर्षांनंतर वास्कोतील गांधीनगरवासियांना लाभला पक्का डांबरी रस्ता

चौपदरी महामार्गामुळे उजळले भाग्य

प्रतिनिधी /वास्को

वास्कोतील वरूणापुरी ते गांधीनगरवासियांना प्रथमच पक्का रस्ता लाभलेला आहे. या भागात वस्ती अस्तित्वात आल्यापासून पक्का रस्ता तयार झाला नव्हता. मुरगाव बंदराला जोडला जाणारा हा चौपदरी महामार्ग कधी पूर्ण होणार याचा पत्ता नसला तरी या महामार्गामुळे वरूणापुरी ते गांधीनगरवासियांची मात्र चांगली सोय झालेली आहे. मागच्या पन्नास वर्षांपासून या लोकांना पक्क्या रस्त्याची प्रतिक्षा होती. मुरगाव बंदराच्यानिमित्ताने त्यांचेही भाग्य उजळले आहे.

वरूणापुरी मांगोरहिल वास्को ते गांधीनगर म्हणून ओखळल्या जाणाऱया काटे बायणाच्या टेकडीवरील वस्तीपर्यंत पक्का रस्ता कधीच तयार झाला नव्हता. वरूणापुरी नाक्यापासून अवघ्याच अंतरासाठी आणि नौदल वसाहतीच्याच सोयीसाठी त्या ठिकाणी छोटासा रस्ता पूर्वी होता. पुढे गांधीनगरपर्यंत जाण्यासाठी मात्र, दगडधोंडेच पार करावे लागत होते. गांधीनगरपर्यंतचे अंतर सुमारे एका किलो मिटरचे आहे. या भागात वस्ती अस्तित्वात येऊन पन्नास वर्षे उलटली आहेत. मात्र, रस्ताच नव्हता. तेथील टेकडीवरील लोकांना बायणात खाली उतरूनच पुढचा प्रवास करावा लागत होता. वरूणापुरी ते गांधीनगर दरम्यान दोन्ही बाजुला नौदलाची वसाहत आहे. दोन्ही बाजुनी नौदलाची कुंपणे असून मधली मोकळी जमीन रस्त्यासाठीच आजतपर्यंत राखीव होती.  1970 सालापासूनच मांगोरहिल वरूणापुरी गांधीनगर ते व्हाया बायणा एक महामार्ग मुरगाव बंदराला जोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्या काळी दुपदरी महामार्गाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ही योजना 1998 मध्ये दुपदरीच्या जागी चौपदरी महामार्गाच्या स्वरूपात प्रत्यक्षात आली. एमपीटीनेच त्यासाठी केंद्रीय स्थरावर जोर लावला होता. या महामार्गाचे काम 98 साली वेर्णापासून सुरू झाले तरी वरूणापुरी ते गांधीनगर या पट्टय़ासाठी रस्ताच नव्हता. दगड धोंडय़ाच्या जमीनीवरून लोकांची पायपीट किंवा सायकलस्वारी होत असे. पंधरा वर्षांपूर्वी या भागात महामार्गाच्या कामासाठी जमीनीची खुदाई सुरू झाली होती. मात्र, ते काम अर्धवटच पडून राहिले. त्यामुळे त्या भागातील लोकांचे कष्ट अधिकच वाढले. पुढे साधारण दहा वर्षांपूर्वी पुन्हा या महामार्गाचे बरेच काम पूर्ण करण्यात आले. मात्र, हा महामार्ग वाहन चालवण्या लायक तयार केलाच नाही. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत हा महामार्ग खडी पसरलेल्या अवस्थेत आणि ओबडधोबड असाच होता. बरीच वर्षे या रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे धुळीचे साम्राज्यही या भागात पसरले होते. हा रस्ता पार करणे त्रासदायक ठरल्याने तेथील बहुतेक लोक बायणा भागात उतरणे पसंद करीत होते. सोयीस्कर रस्ताच नसलेला वास्कोतील हा महत्वाचा भाग होता. हा भाग परप्रांतीयांच्या दाट वस्तीने भरलेला असल्याने त्याची गंभीर दखलही कोणी घेतली नाही. आणि हा रस्ता तयार व्हावा म्हणून तेथील लोकांनी फारसा आवाजही केला नाही. केवळ एक किलो मिटर अंतराच्या या रस्त्याचे काम शंभर टक्के पूर्ण करून तो वाहतुकीस खुला करणे अवघड नव्हते. मात्र, सरकारला या लोकांना रस्ता तयार करून देण्यास बरीच वर्षे लागली. त्यामुळे या लोकांमध्ये नाराजी होती.

  पन्नास वर्षांहून अधिक काळ केवळ कच्चा आणि ओबडधोबड रस्ता नशिबी आलेल्या गांधीनगरातील लोकांना आता डांबरीकरण केलेला पक्का चौपदरी महामार्ग लाभलेला आहे. मागच्या साधारण दोन महिन्यांपासून या कच्चा रस्त्याचे स्वरूप पूर्णपणे बदललेले असून एक विस्तीर्ण रस्ता उपलब्ध झाल्याने या लोकांमध्ये समाधान पसरले आहे. त्यांचे मागच्या पन्नास वर्षांपासूनचे कष्ट आता संपलेले आहेत. हा रस्ता अद्याप पूर्णपणे खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक मुले सध्या या रस्त्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेऊ लागली आहेत.

वरूणापुरी ते हेडलॅण्ड सडापर्यंतचा महामार्ग 1 जानेवारीला खुला होण्याची शक्यता

  वेर्णापासून मुरगाव बंदराला व्हाया वरूणापुरी, गांधीनगर व बायणामार्गे जोडला जाणारा हा महामार्ग सध्या तरी गांधीनगरपासून बोगदय़ापर्यंत उड्डाणपुलाव्दारे जोडण्यात आलेला आहे. वेर्णापासून वरूणापुरीपर्यंत हा महामार्ग 2003 साली म्हणजेच पाच वर्षात पूर्ण झाला होता. त्यानंतर वरूणापुरीपासून पुढील महामार्गाचे काम 2015 पर्यंत बंदच होते. मागची सहा वर्षे या महामार्गाचे काम चालू आहे. मात्र, अद्याप हा महामार्ग बंदराला जोडण्याचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या तरी हेडलॅण्ड सडा भागापर्यंतच हा महामार्ग पोहोचलेला आहे. वरूणापुरी ते हेडलॅण्ड सडापर्यंत पूर्ण झालेला हा चौपदरी महामार्ग गोवा मुक्तीदिनी खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, तांत्रीक अडचणी उभा राहिल्याने ते नियोजन फिस्कटले. आता या महामार्गाचे उद्घाटन 1 जानेवारीच्या मुहुर्तावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

‘कोरोना’साठी प्रशासन सज्ज

Amit Kulkarni

कॅसिनोंचे व्यापार परवाने नूतनीकरणाचा मार्ग मोकळा मनपाच्या बैठकीत मंजुरी

Omkar B

रानडुकरांचा उपद्रवी घोषित करण्याचे सरकारच्या निर्णयाचे शेतकऱयाकडून स्वागत

Amit Kulkarni

आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने

Amit Kulkarni

अभिनय ही क्रिया नव्हे, प्रतिक्रिया

Amit Kulkarni

पोर्तुगिजकालीन चिंबल तळीच काम नोव्हेंबरात हाती घेणार

Patil_p