साडे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त; चार संशयित अटक; यातील एकावर खुनाचा तसेच खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल; हे चारही गुन्हेगार रेकॉर्डवरील; स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
सांगली प्रतिनिधी
जिल्हय़ात गेल्या सहा महिन्यात झालेल्या अनेक घरफोडय़ांची उकल स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने केली आहे. जिल्हय़ातील 50 घरफोडय़ा उघडकीस आणल्या असून या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 15 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यात एकाचवेळी इतक्या मोठया प्रमाणात घरफोड्य़ा उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी अटक केलेल्या संशयितांमध्ये दोघे सख्खे भाऊ आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोबाईल भैरू पवार वय 19 रा. करंजवडे, ता. वाळवा, जि. सांगली, घायल सरपंच्या काळे वय 46 रा. चिकुर्डे, ता. वाळवा, जि. सांगली, इकबाल भैरू पवार वय 40 रा. करंजवडे, ता. वाळवा. जि. सांगली, प्रवीण राज्या शिंदे वय 31 रा. गणेशवाडी, ता. वडूज जि. सातारा अशी नावे आहेत. यातील इकबाल भैरू पवार याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील खुनाचा प्रयत्न करणे असा गुन्हा दाखल आहे. तर आष्टा पोलीस ठाण्याकडे खुनाचा गुन्हा दाखल आहे. प्रवीण राज्या शिंदे याच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल आहे.
कारंदवाडी येथे संशयित अटकेत
हे चारही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यांचा शोध गेल्या काही दिवसापासून स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक घेत होते. पण यांचा शोध लागत नव्हता. कारंदवाडी येथील जलस्वराज्य प्रकल्प याठिकाणी यातील काही संशयित लपले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, चेतन महाजन, संदीप नलवडे, विनायक सुतार यांना मिळाली त्यांनी याठिकाणी छापा टाकला असता मोबाईल पवार आणि घायळ काळे हे दोघे सापडले. तर खोत पोल्ट्री फार्म डोंगरवाडी येथे इकबाल पवार आणि प्रवीण शिंदे हे दोघे सापडले. या चौघांच्याकडे कसून शोध घेतला असता त्यांनी 50 घरफोडय़ा केल्याचे मान्य केले. त्यानुसार हा मुद्देमालाचा शोध घेवून हा मुद्देमाल शोधून आणण्यात आला.
जिल्हय़ातील सर्वच पोलीस ठाण्यातंर्गत घरफोडी
या चौघांनी सांगली शहर, कासेगाव, शिराळा, आष्टा, इस्लामपूर, कुंडल, महात्मा गांधी पोलीस चौकी, सांगली ग्रामीण, जत, पलूस, कवठेमहांकाळ, कुपवाड एमआयडीसी, तासगाव, आटपाडी, विटा, मिरज शहर या पोलीस ठाण्यातंर्गत या 50 घरफोडय़ा केल्या आहेत. या सर्व घरफोडय़ाची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणने घेतली असून त्यांच्याकडून याचा तपास सुरू आहे. या चोरटय़ांकडून 15 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 250 ग्रॅम सोन्याचे दागिने. त्याची किंमत 12 लाख 50 हजार आहे. तर दीड लाख रूपये किंमतीची दीड किलो चांदी आणि रोख 95 हजार रूपये तसेच दोन मोटारसायकली असा एकूण 15 लाख 45 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण घरफोडीतील 75 टक्के मुद्देमाल या चोरटय़ांच्याकडून जप्त करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.
स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या या पथकाची कारवाई
स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, भगवान पालवे, दीपक गायकवाड, सुनील चौधरी, अरूण औताडे, मेघराज रूपनर, सुधीर गोरे, निलेश गदम, हेमंत ओमासे, चेतन महाजन, संदीप नलवडे, नागेश खरात, सचिन धोत्रे, कुबेर खोत, सुनील लोखंडे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, ऋषीकेश सदामते, संकेत कानडे, सुनील जाधव, विनायक सुतार सोहेल कार्तियानी, ऋतुराज हाळकर, कॅप्टन गुंडवाडे यांनी ही कारवाई केली.