नवी दिल्ली
वर्ष 2022 प्रायमरी मार्केटसाठी निराशाजनक राहिले आहे. चालू वर्षात आतापर्यंत आलेल्या आयपीओंची संख्या ही वर्षाच्या आधारे कमीच राहिली आहे. परंतु परताव्याबाबत या आयपीओंच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे.
2022 मध्ये आतापर्यंत सदरच्या आयपीओंनी 50 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. जो सेन्सेक्स आधारे 1.6 टक्क्यांची तेजी नोंदवतो. चालू वर्षात आतपर्यंत आलेल्या 51 आयपीओंतून कंपन्यांनी एकूण 38,155 कोटी रुपये उभारले असून मागील वर्षाच्या समान कालावधीत 55 आयपीओ सादर करण्यात आले हेते. त्यावेळी कंपन्यांनी 64,768 कोटी रुपये उभारले असल्याची माहिती आहे.
चालू वर्षातील सर्वात मोठा आयपीओ
मागील वर्षाच्या तुलनेत 2022 मध्ये आतापर्यंत फक्त आठ आयपीओ हे सर्वात मेठे राहिले आहेत. यामध्ये एलआयसीचा आयपीओ हा सर्वात मोठा 15,381 कोटी रुपयांचा राहिला आहे. परंतु परतावा देण्याची कामगिरी पाहता म्हणावी तशी झेप घेण्यात कंपनीला यश मिळाले
नाही.
2021मध्ये सेन्सेक्समध्ये 20 टक्क्यांच्या तेजीच्या तुलनेत आयपीओंचा परतावा
विश्लेषणात्मक अहवालानुसार 2021 च्या दरम्यान सेन्सेक्समध्ये 20 टक्के तेजीच्या तुलनेत आयपीओने 74 टक्के परतावा दिला आहे. परंतु 1,000 कोटीपेक्षा अधिकच्या रक्कमेच्या 16 मोठय़ा आयपीओंचे समभाग सवलतीमध्ये ट्रेड करत आहेत.