दोन उपमुख्यमंत्री, 16 कॅबिनेट, 14 स्वतंत्र प्रभार, 20 राज्यमंत्र्यांचा समावेश : दानिश
लखनौ / वृत्तसंस्था
योगी 2.0 सरकारचा शपथविधी सोहळा शुक्रवारी सायंकाळी भव्यदिव्य स्वरुपात पार पडला. योगींनी दुसऱयांदा उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासमवेत केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर 50 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 52 सदस्यीय मंत्रिमंडळात 16 कॅबिनेट मंत्री, 14 स्वतंत्र प्रभार आणि 20 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, श्रीकांत शर्मा, सतीश महाना, मोहसीन रझा आणि मागील सरकारमधील 20 मंत्र्यांना या सरकारमध्ये स्थान मिळालेले नाही. शपथविधीनंतर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली पहिली मंत्रिमंडळ बैठकही पार पडली.
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी पर्वाला सुरुवात झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी दुसऱयांदा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी सोहळास्थळी पोहोचल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत शपथविधीला सुरुवात झाली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक आमदारांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.
जातीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न
उत्तरप्रदेशमधील सत्तेचे समीकरण जुळवताना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळ 2.0 मध्ये जातीय आणि प्रादेशिक समीकरणासोबतच जुन्या मंत्रिमंडळात असलेल्या आमदारांचा मानही कायम ठेवण्यात आला आहे. मंत्रिमंडळात सर्वाधिक 18 ओबीसी, 10 ठाकूर, 8 ब्राह्मण, 7 दलित, 3 जाट, 3 बनिया, दोन पंजाबी आणि एक मुस्लीम चेहरा आहे. तसेच माजी सनदी अधिकाऱयांसह डॉक्टर, इंजिनीअर, एमबीए आणि वकील यांचाही समावेश आहे. एकूण मंत्र्यांपैकी 22 मंत्री त्यांच्या पहिल्या सरकारच्या कार्यकाळातील आहेत.
गुरुवारी योगी आदित्यनाथ यांची एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला होता. उत्तरप्रदेशच्या इतिहासात तीन दशकांहून अधिक काळानंतर एखाद्या मुख्यमंत्र्याला योगी आदित्यनाथ यांच्यारुपाने दुसऱयांदा पद भूषवण्याची संधी मिळाली आहे. भाजपला मिळालेल्या मोठय़ा जनादेशामुळे हे सर्व शक्मय झाले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक विजयानंतर योगींचा शपथविधी सोहळाही ऐतिहासिक ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप प्रदेक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिसवा सरमा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री एम. एल. खट्टर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज भाजप नेते उपस्थित होते.