14 मुस्लीम, 9 ब्राह्मण चेहऱयांना संधी : 12 उमेदवार ओबीसी समुदायाचे
वृत्तसंस्था/ लखनौ
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी स्वतःच्या जन्मदिनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 53 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उर्वरित 5 उमेदवारांची नावे पुढील एक-दोन दिवसात घोषित होणार आहेत. आगामी निवडणुकीकरता पक्षाकडून सतीश मिश्रा आणि आनंद यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
बसप निवडणुकीनंतर उत्तरप्रदेशच्या सत्तेत पुनरागमन करणार आहे. बसपच्या मागील कामकाजाच्या आधारावर लोक मतदान करतील आणि पक्षाला सत्तेवर आणतील असे उद्गार मायावती यांनी काढले आहेत. बसपकडून मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये मुस्लिम चेहऱयांना संधी देण्यात आली आहे.
53 पैकी 14 उमेदवार हे मुस्लीम आहेत. तर 9 चेहरे हे ब्राह्मण समुदायाचे आहेत. अनुसूचित जातीचे 9, क्षत्रिय 4 तर 12 चेहरे हे मागास वर्गाशी संबंधित आहत. यात जाट, गुर्जर आणि यादवांचा समावेश आहे. तर 3 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. आम्ही कुठल्याच पक्षासोबत आघाडी करणार नाही. यंदा आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास असल्याचे मायावती म्हणाल्या.
राज्यात अनेक लोक पक्षांतराचे राजकारण करत असले तरीही यावेळी ते उपयुक्त ठरणार नाही. सरकारने जनतेसोबत विश्वासघात केला आहे. भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. कोरोना महामारीमुळे मृत्यू झालेल्या लोकांना पक्षाकडून मदत करण्यात येत आहे. आमचा पक्ष नेहमीच मदतीला धावून जाणारा पक्ष आहे. याचमुळे 4 वेळा बसपचे सरकार आले असून माझ्या जन्मदिनी दरवेळी नव्या जनहित योजना राबविण्यात आल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.
काशीराम यांची प्रकृती बरी असेपर्यंत ते सर्व जबाबदारी सांभाळायचे आणि मी निवडणूक लढवत होते. मी प्रत्यक्षस्वरुपात निवडणूक लढविणार नसले तरी पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प घेतला आहे. आम्हाला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढविल्या जात असल्याचे मायावती म्हणाल्या.