भाविकांचा अतिरिक्त बससेवेला प्रतिसाद : आर्थिक अडचणीत सापडलेल्या परिवहनला दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी सोडलेल्या जादा बसमधून परिवहनला तब्बल 53 लाखाचा महसूल प्राप्त झाला. नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी परिवहनने अतिरिक्त बससेवा पुरविली होती. याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या अतिरिक्त बससेवेतून परिवहनला समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लम्मा यात्रेसाठी नवरात्रोत्सव काळात दररोज 50 हून अधिक जादा बस सोडण्यात आल्या होत्या. नवरात्रोत्सव काळात यल्लम्मा सौंदत्तीला जाणाऱया भाविकांची संख्या अधिक असते. बेळगावबरोबरच खानापूर, महाराष्ट्र आणि गोवा येथूनही भाविक सौंदत्तीला भेट देतात. दरम्यान भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने जादा बस सोडल्या होत्या. या बसेसना अपेक्षेप्रमाणे प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे परिवहनला 50 लाखाहून अधिक उत्पन्न प्राप्त झाले आहे. कोरोनामुळे दोन वर्षे परिवहन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले होते. त्यामुळे परिवहनची अतिरिक्त बससेवाही जाग्यावर थांबून होती. उत्पन्नही थांबले होते. मात्र आता यात्रा-जत्रा पूर्ववत सुरू झाल्याने परिवहनची अतिरिक्त बससेवादेखील सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे उत्पन्नही हळूहळू वाढू लागले आहे.
कोरोनाआधी सौंदत्ती यल्लम्मा यात्रेतून परिवहनला 50 लाखापर्यंत उत्पन्न मिळत होते. त्या तुलनेत यंदाच्या नवरात्रोत्सव काळात 53 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच यंदा 3 लाख अधिक उत्पन्न सौंदत्ती यल्लम्मा यात्रेतून मिळाले आहे. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर देव-देवतांच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सौंदत्ती यात्रेतून मिळणारे उत्पन्नही वाढले आहे.
यंदा 3 लाख रुपयांनी उत्पन्नात वाढ
नवरात्रोत्सव काळात झालेल्या सौंदत्ती यात्रेतून 53 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. यात्राकाळात अतिरिक्त बससेवा सोडण्यात आली होती. कोरोना आधीची तुलना करता यंदा 3 लाख रुपयांनी उत्पन्न वाढले आहे. भाविकांचा दर्शनासाठी ओघ वाढला होता. गैरसोय टाळण्यासाठी जादा बस सोडण्यात आल्या होत्या. –
के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)