आंचिममध्ये द स्टोरीटेलरचे आज विशेष स्क्रीनिंग
पणजी : इंडियन पॅनोरमा विभागात निवडला गेलेला अनंत महादेवन दिग्दर्शित ‘द स्टोरी टेलर’ हा चित्रपट दिव्यांगजन विभागात विशेष स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत परेश रावल, आदिल हुसैन, रेवती यांच्या आहेत.
तारिणी रंजन बंदोपाध्याय हे एक भटकंती कथाकार आहेत जे कधीच एका कामावर टिकून राहू शकले नाहीत. ज्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात 32 नोकऱया बदलल्या. आता वयाच्या 60व्यावर्षी कोलकात्यातनिवृत्त आणि विधुर, यांना एकच खंत आहे की तो आपल्या दिवंगत पत्नीला हयात असताना नेहमी आवश्यक असलेल्या सुट्टीवर कधीही घेऊन जाऊ शकले नाही. आणि आता अचानक, नोकरी नसताना, त्याच्याकडे मोकळा वेळ आहे पण त्याचा जवळचा साथीदार त्याच्यासोबत नाही. ही खंत व्यक्त ‘द स्टोरीटेलर’ या चित्रपटात करण्यात आली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले आहे. तर पटकथा किरीट खुराना यांची आहे. सदर चित्रपट आज सोमवार दि. 21 रोजी सायं. 5.30 वा. आयनॉक्स स्क्रीन 2 येथे दाखविण्यात येणार आहे.
प्रादेशिक भाषेच्या सौंदर्याचे प्रदर्शन करणारा इंडियन पॅनोरमा
पणजी : गोव्यात नुकताच मोठय़ा दिमाखात 53वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले असून आजपासून चित्रपटांची तसेच चर्चासत्रांची रेलचेल सुरू होणार आहे. आज सोमवार दि. 21 रोजी म्हणजेच आंचिमच्या पहिल्या दिवशी या महोत्सवातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा विभाग म्हणजे इंडियन पॅनोरमा विभागाचे उद्घाटन पृथ्वी कोनानूर्स यांच्या ‘हदिनेलेन्तु’ या कन्नड चित्रपटाने आणि दिव्या कोवास्जी यांच्या ‘शो मस्ट गो ऑन’ या चित्रपटाने दुपारी 12 वा. आयनॉक्स स्क्रीन 2 येथे होणार आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील महत्त्वाचा विभाग म्हणून इंडियन पॅनोरमा विभागाला मानले जाते. दरवर्षी या विभागात चित्रपटातून नाविन्य आणि विविध विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा या विभागात 25 फिचर तर 19 नॉन फिचर चित्रपट दाखविले जाणार आहे.
प्रादेशिक चित्रपटांना प्राधान्य
इंडियन पॅनोरमा विभागात यंदा प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच काही मुख्य प्रवाहातील चित्रपटांचाही समावेश यात आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा या विभागात साईनाथ उस्कैकर दिग्दर्शित ‘वाग्रो’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. तसेच विनोद मंकरा दिग्दर्शित ‘यानम’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. याशिवाय हिंदी, मराठी, तेलुगु, इंग्रजी, बंगाली, मल्याळम, तमिळ, या भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे. तसेच इरूला आणि मैथिली या भाषेतील प्रत्येकी एक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. याचबरोबर विक्रम पटवर्धन दिग्दर्शित प्रेम, दिगपाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज, डॉ. सलील कुलकर्णी यांचा गाजलेला एकदा काय झालं चित्रपटही या विभागातून दाखविला जाणार आहे.
इंडियन पॅनोरमाच्या चित्रपट विभागात डॉ. सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झालं’, विद्यासागर राजू दिग्दर्शित ‘खुदीराम बोस,’ था.से.ग्नानावेल दिग्दर्शित ‘जय भीम’, तसेच संपूर्ण देशभरात गाजलेला आणि काश्मिरमधील काश्मिर पंडितावर आधारित विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘काश्मिर फाईल्स’, एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’, शिवसेना नेता आनंद दिघे यांच्यावर आधारित प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर… मुक्काम पोष्ट ठाणे’ हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे आयोजकांकडून यंदा या विभागातून सिनेरसिकांसाठी उत्कृष्ट चित्रपटांची पर्वणी देण्यात आली आहे. देशप्रेम, संस्कृती, व्यक्तिचित्रण, सत्य घटनेवर आधारित, काही काल्पनिक तर काही आजच्या युवापिढीला संदेश देणारे चित्रपट या विभागातून दाखविले जाणार आहेत.
इंडियन पॅनोरमा विभागाच्या चित्रपट विभागातील चित्रपटांची निवड प्रसिद्ध दिग्दर्शक आणि संपादक विनोद गणात्रा यांच्या अध्यक्षतेखालील 12 सदस्यांच्या समितीने केली आहे. तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते, फिल्ममेकर, निर्माते ऑईनम दोरेन यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीकडून नॉन फिचर फिल्मची निवड करण्यात आली आहे.
या विभागाच्या नॉन फिचर फिल्म विभागात साईनाथ उसकईकर दिग्दर्शित ‘वाग्रो’ या गोमंतकीय चित्रपटाचे प्रदर्शन दि. 26 रोजी होणार आहे. याशिवाय जयदीप मुखर्जी दिग्दर्शित सत्यजित रे यांच्यावर आधारित ‘अदर रे ः आर्ट ऑफ सत्यजित रे’ विनोद मंकरा यांच्या ‘यानम’ या संस्कृत भाषेतील चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. याशिवाय या विभागात भोतिया, इंग्रजी, हिंदी, कन्नड, मल्याळम्, मणिपुरी, तामिळ भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे.
दीपा आणि हरी बारावीचे विद्यार्थी आहेत, दोघेही शनिवारी दुपारी वर्ग संपल्यानंतर वर्गात दीपाच्या फोनवर आपले जिव्हाळय़ाचे क्षण रेकॉर्ड करतात आणि सोमवारी मुख्य़ाध्यापक त्यांना त्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर वायरल झाल्याचे सांगतात. त्यांचे कुटुंब विस्कळीत. शाळेतून त्यांना काढले जाते आणि त्यांच्या भवितव्याचा शाळा प्रशासन निर्णय घेते. परंतु जेव्हा त्यांच्या जातीचा प्रश्न समोर येतो तेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात हे सांगणारा ‘हदिनेलेन्तु’ चित्रपट आहे. हा चित्रपट कन्नड भाषेत असून याचे दिग्दर्शन पृथ्वी कोनानूर यांनी केले आहे. या चित्रपटाने आज दि. 21 रोजी इंडियन पॅनोरमाचा शुभारंभ होणार आहे.
तसेच ‘शो मस्ट गो ऑन’ या लघुपटानेही इंडियन पॅनोरमाचा शुभारंभ होणार असून अनेक दशकांच्या निषक्रियतेनंतर, पारशी रंगभूमीचे दिग्गज कलाकार शेवटच्या वेळी रंगमंचावर परतले. तालीम दरम्यान गोंधळाच्या दरम्यान, माहितीपट शेवटच्या वेळी स्टेजवर सर्वांना जिंकण्यासाठी तिच्या संघर्षाचे अनुसरण करते. रिहर्सल दरम्यान सर्जनशील उलथापालथ कलाकारांमधील एक महिन्याच्या संवेदनशीलतेचे आणि विनोदाचे अंतरंग चित्र देते. पण शोच्या आदल्या दिवशी कलाकारावर मोठी शोकांतिका घडते. हे सर्व बदलेल की शो असेल? हे सांगणारा हा लघुपट आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन दिव्या कोवास्जी यांनी केले आहे.
आंचिममध्ये आज दृश्यम2चा प्रीमीयर
पणजी : गोव्यात 20 ते 28 रोजीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज सोमवार दि. 21 रोजी सस्पेन्स थ्रिलरचा तडका असलेला अभिषेक पाठक दिग्दर्शित आणि अजय देवगण यांचा दृश्यम 2 चित्रपटाचा गाला प्रीमीयर होणार आहे. सदर चित्रपट आयनॉक्स स्क्रीन 1 मध्ये सायं. 7.30 वा. दाखविण्यात येणार आहे.
या प्रीमीयरवेळी प्रमुख भूमिकेतील अजय देवगण, तब्बू, व चित्रपटाचे इतर कलाकार उपस्थित राहतील. ‘ 2 अक्तूबर को क्या हुआ था?’ हा प्रश्न सिनेप्रेमींना चांगलाच माहिती असेल. 2015मध्ये प्रदर्शित झालेल्या दृश्यम या चित्रपटातील डायलॉग बऱयापैकी गाजला होता. यावर अनेकांनी सोशल मीडीयावर मीम्सही वायरल केले होते. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट ठरला. पहिल्या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून प्रेक्षक अवाप् झाले होते. आता पुन्हा सस्पेन्स आणि थ्रिलरचा डबल डोस घेऊन ‘दृश्यम2’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.