पुणे / वार्ताहर :
यूएसए क्रिकेट कौन्सीलकडे 20-20 या क्रिकेट क्रिडा प्रकारात क्रिकेट स्पर्धा चालू करण्यासाठी यूएसएस क्रिकेट लिगचे 40 टक्के शेअर्स मिळवून देण्याच्या अमिषाने एका व्यावसायिकाची तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली .
सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशिद खान, सिराज हुसेन, विक्रम चौधरी (सर्व रा.मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आशिष पोपटराव कांटे (वय-41, रा. एरंडवणा, पुणे) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार सन 2019 ते आजपर्यंत घडलेला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी तक्रारदार आशिष कांटे यांना यूएसए क्रिकेट कौन्सीलकडे क्रिकेट स्पर्धा सुरु होणार असल्याचे सांगितले. या क्रिकेट स्पर्धेच्या मालकी हक्काचे शेअर्स घेतल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. यासाठी वेळोवेळी एकूण 55 लाख रुपये विश्वासाने घेतले. परंतु पैसे परत न देता फसवणूक केली.
अधिक वाचा : बेळगावातील हल्ल्याचे पुण्यात पडसाद; कर्नाटकच्या बसेसला फासलं काळं