Tarun Bharat

6 चेंडू…6 दिशा-उपदिशा अन् 6 षटकार!

Advertisements

हॅट्ट्रिकवीर धनंजयाच्या गोलंदाजीवर पोलार्डचा भीमपराक्रम, षटकात 6 षटकार खेचणारा पोलार्ड तिसरा फलंदाज

कॉलिज (अँटिग्वा) : विंडीजचा विस्फोटक फलंदाज केरॉन पोलार्डने येथील पहिल्या टी-20 सामन्यात  अकिला धनंजयाच्या एकाच षटकात सलग 6 षटकार खेचले आणि 6 चेंडूत 6 षटकार खेचणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फक्त तिसरा फलंदाज ठरला. 14 वर्षांपूर्वी भारताच्या युवराज सिंगने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात 6 षटकारासाठी भिरकावले होते. याशिवाय हर्षल गिब्जने 2007 विश्वचषकात असा पराक्रम गाजवला होता. या उभयतांच्या पंगतीत आता पोलार्ड देखील दाखल झाला आहे.

श्रीलंकन लेगस्पिनर अकिला धनंजयासाठी ही लढत एकीकडे हॅट्ट्रिक नोंदवली असल्याने स्वप्नवत यश देणारी ठरली. धनंजयाने इव्हिन लुईस, ख्रिस गेल व निकोलस पूरन यांना सलग 3 चेंडूंवर बाद करत हॅट्ट्रिक साजरी केली. पण, त्यापुढील षटकातच पोलार्डने त्याच्या 6 चेंडूत 6 षटकार फटकावल्याने धनंजयाला नामुष्की देखील याच लढतीत अनुभवाला आली. यामुळे, एका अर्थाने धनंजयाला जसे गगनचुंबी यश मिळाले, त्याचप्रमाणे पाताळात फेकले जाण्याची नामुष्की देखील सोसावी लागली. या पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेने 9 बाद 131 धावा केल्या तर प्रत्युत्तरात विंडीजने 13.1 षटकात 6 गडय़ांच्या बदल्यात 134 धावांसह सहज विजय संपादन केला. 6 चेंडूत 6 षटकारांचा विक्रम करणाऱया पोलार्डने सामन्यात 11 चेंडूत 38 धावांची आतषबाजी केली.

अकिलाच्या गोलंदाजीवर तिसरा षटकार खेचल्यानंतर आपण षटकात 6 षटकार खेचू शकतो, याचा अंदाज आला होता, असे पोलार्ड या सामन्यानंतर म्हणाला. मी धनंजयाची हॅट्ट्रिक पूर्ण पाहिली नव्हती. पण, फलंदाजीला उतरलो, त्यावेळी मागील षटकात काय झाले, याची पर्वा करण्याऐवजी संघाला विजय मिळवून देण्यासाठी फटकेबाजी करण्याचे माझे लक्ष्य होते. त्यात मी यशस्वी ठरलो, याचाही त्याने पुढे उल्लेख केला.

लंकेच्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या एकवेळ 5 षटकात 4 बाद 62 धावा झाल्या होत्या. त्यानंतर अकिलाच्या 6 व्या षटकात पोलार्डने 6 षटकार वसूल करत 36 धावा वसूल केल्या आणि इथेच हा सामना विंडीजच्या बाजूने झुकला.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका 20 षटकात 9-131 (निसांका 34 चेंडूत 39, ओबेद 2-25), विंडीज ः 13.1 षटकात 6-134 (पोलार्ड 11 चेंडूत 38, होल्डर 29).

पोलार्डचे 6 चेंडूतील 6 गगनचुंबी षटकार!

  • 5.1 : अकिलाच्या लेंग्थबॉलवर लाँगऑनकडे षटकार
  • 5.2 : अकिलाच्या फुलर लेंग्थ चेंडूवर साईटस्क्रीनकडे षटकार
  • 5.3 : वाईड लाँगऑफच्या दिशेने तिसरा उत्तूंग षटकार
  • 5.4 : लेंग्थ बॉलवर डीप मिडविकेटच्या दिशेने षटकार
  • 5.5 : आऊटसाईड ऑफ स्टम्पवर गोलंदाजाच्या डोक्यावरुन षटकार
  • 5.6 : डीप मिडविकेटच्या दिशेने आणखी एक उत्तूंग षटकार!

Related Stories

कतारचा धावपटू वाहन अपघातात ठार

Patil_p

नेपोमनियाचीचे अग्रस्थान कायम

Patil_p

भारत-दक्षिण आफ्रिका आज दुसरा वनडे सामना

Amit Kulkarni

युपी योद्धा, हरियाणा स्टीलर्स विजयी

Patil_p

नेतृत्व विभागणीची संकल्पना आपल्या संस्कृतीत बसत नाही

Patil_p

ओडिशा जॉगरनॉट्स, गुजरात जायंट्स विजयी

Patil_p
error: Content is protected !!