डीसीसी बँक मुरगोड शाखा चोरीप्रकरणाचा छडा : क्लार्कसह तिघांच्या आवळल्या मुसक्मया
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुरगोड शाखेतील चोरी प्रकरणाचा उलगडा झाला आहे. चोरीच्या घटनेनंतर आठच दिवसात या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात पोलीस दलाला यश आले असून बँक कर्मचाऱयाच्या मदतीनेच 6 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरण्यात आला होता, अशी माहिती उघडकीस आली आहे. चोरीचा ऐवज उसाच्या फडात पुरून ठेवून त्यावर उसाची लागवडही करण्यात आली होती. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी रविवारी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी आदी वरिष्ट अधिकारी उपस्थित होते. या चोरीच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हय़ात खळबळ माजली होती. सुरुवातीपासून चोर माहीतगार असावा, असा संशय पोलिसांना होता. तो संशय खरा
ठरला.
बसवराज सिद्दलिंगप्पा हुणशीकट्टी (वय 30) रा. तोरणगट्टी, ता. रामदुर्ग, संतोष काळाप्पा कंबार (वय 31) रा. यरगट्टी, गिरीश ऊर्फ यमनाप्पा लक्ष्मण बेळवल (वय 26) रा. जिवापूर, ता. सौंदत्ती अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाची नावे आहेत. बसवराज हा मध्यवर्ती बँकेच्या मुरगोड शाखेत क्लार्क असून आपल्या अन्य दोन मित्रांच्या मदतीने आपल्याच बँकेत त्याने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
गेल्या रविवार दि. 6 मार्च रोजी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. बनावट चाव्यांचा वापर करून 4 कोटी 37 लाख 59 हजार रोख रक्कम, 1 कोटी 63 लाख 72 हजार 220 रुपये किमतीचे 3 किलो 148.504 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते. यासंबंधी बँकेचे व्यवस्थापक प्रमोद कृष्णाप्पा यलीगार यांनी मुरगोड पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथके नियुक्त केली होती. पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी, मुरगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर माली-पाटील, बैलहोंगलचे पोलीस निरीक्षक यू. एच. सातेनहळ्ळी, जिल्हा सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक वीरेश दोडमनी, मुरगोडचे पोलीस निरीक्षक प्रवीण गंगोळ, सौंदत्तीचे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, रामदुर्गचे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली, चांदबी गंगावती आदींचा या पथकात समावेश होता.
जिल्हा पोलीसप्रमुखांनी मध्यवर्ती बँकेतील चोरी प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी तांत्रिक विभागाचीही मदत घेण्यात आली. बँकेच्या मुरगोड शाखेत क्लार्क म्हणून काम करणाऱया बसवराज हुणशीकट्टी याने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन ही चोरी केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व तिघा जणांच्या मुसक्मया आवळल्या. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.
तांत्रिक विभागाच्या मदतीने पोलिसांना यश
या चोरी प्रकरणाच्या तपासाचे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकले होते. कारण सीसीटीव्ही कॅमेरे असूनही त्याचा डीव्हीआर चोरण्यात आला होता. त्यामुळे चोरटय़ांचा माग काढणे कठीण बनले होते. तांत्रिक विभागाच्या मदतीने पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहोचले. जर या प्रकरणाचा छडा लागला नसता तर उसाची तोडणी झाल्यानंतर ऐवज बाहेर काढण्याचा विचार गुन्हेगारांनी केला होता.