कोलार जिल्हय़ातील घटना : महामार्गावर ट्रक अडवून लूट
प्रतिनिधी /बेंगळूर
ट्रक अडवून भामटय़ांनी तब्बल 6 कोटी रुपये किमतीचे मोबाईल लांबविले आहेत. कोलार जिल्हय़ाच्या मुळबागिल तालुक्यातील नेर्नहळ्ळी येथे गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. चोरटय़ांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे.
तामिळनाडूच्या कांचीपुरम येथून मोबाईलची वाहतूक करणारा ट्रक बेंगळूरकडे निघाला होता. गुरुवारी मध्यरात्री मुळबागिलनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 75 वर देवरायनसमुद्र येथे अज्ञातांनी ट्रक अडवून चालकाला मारहाण केली. चालकाच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून ट्रकसह पलायन केले. नंतर नेर्नहळ्ळी गेट येथे ट्रक थांबवून दुसऱया ट्रकमध्ये मोबाईल पार्सलचे बॉक्स भरून पोबारा केला. एमआय कंपनीचे 6 कोटी रुपये किमतीचे मोबाईल चोरटय़ांनी पळविल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवारी दुपारी ट्रकचालकाचे हातपाय बांधून ठेवण्यात आल्याचे स्थानिकांना आढळून आले. त्यांनी घडलेल्या प्रकाराविषयी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी कोलार जिल्हा पोलीस प्रमुख, मुळबागिल ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणी मुळबागिल पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.