अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 1 कोटी 10 लाखांहून अधिक झाला आहे. अखेरचे 10 लाख रुण केवळ 6 दिवसांमध्ये आढळले आहेत. प्रांतीय सरकारांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. उत्तर डकोटामध्ये मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मिशिगनमध्ये महाविद्यालये, माध्यमिक शाळा आणि कार्यालये तीन आठवडय़ांसाठी बंद करण्यात आली आहेत.
जर्मनीत अडचण कायम
जर्मनीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. चॅन्सेलर अँजेला मर्केल यांचे सरकार आता सौम्य टाळेबंदीचा विचार करत आहे. परंतु राज्य सरकारांनी याला विरोध दर्शविला आहे. जर्मनीत एकूण 16 राज्ये असून त्यांनी टाळेबंदीच्या मुद्दय़ावर केंद्राच्या निर्णयाला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मर्केल आणि या राज्यांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे.
जपान : दुसऱया लाटेचा धोका
जपानमध्ये कोरोना संक्रमणाच्या दुसऱया लाटेचा धोका घोंगावू लागला आहे. प्रतिबंधासाठी अनेक प्रकारची खबरदारी बाळगली आहे. एका क्रीडाउत्पादनांच्या दुकानात विशेष रोबोट ठेवण्यात आला असून तो ग्राहकांनी मास्क लावला आहे की नाही हे पाहतो.
अल्जीरियात नवे निर्बंध
अल्जीरियाने नवे निर्बंध लागू केले आहेत. देशात रुग्ण वाढू लागल्याने क्रीडा केंद्रे, सांस्कृतिक केंद्रे आणि समुद्रकिनाऱयांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. नव्या नियमाच्या अंतर्गत देशाच्या बहुतांश भागांमध्ये रात्रसंचारबंदी लागू आहे.
मंगोलिया : पूर्ण टाळेबंदी
चीनचा शेजारी देश असलेल्या मंगोलियात मागील आठवडय़ात कोरोनाचा रुग्ण सापडला होता. तेथे एका वाहनचालकाच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाली होती. रुग्ण सापडल्याने सरकारने खबरदारीदाखल 1 डिसेंबरपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली आहे. देशात 428 रुग्ण सापडले आहेत.