नॉनस्टॉप 100 किलोमीटर सायकल चालविण्याची किमया
एका 6 वर्षीय मुलाने केलेली कामगिरी जाणून घेतल्यावर तुम्ही थक्क व्हाल. चेन्नईत राहणारा आणि दुसरीत शिकणारा विद्यार्थी रियान कुमारने 100 किलोमीटर नॉनस्टॉप पॅडल मारून वर्ल्ड सायकलिंग रेकॉर्ड केला आहे.
वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्सने रियानला ‘सायकलने 5 तास 17 मिनिटे आणि 6 सेकंदांमध्ये 108.09 किलोमीटरचे अंतर न थांबता कापण्यासाठी सर्वात वेगवान आणि सर्वात कमी वयाचा’ दर्जा दिला आहे. रियानचे पालक भारतीय नौदलात अधिकारी आहेत. ते अलिकडेच दिल्लीहून चेन्नईमध्ये स्थलांतरित झाले होते. रियानने स्वतःची आई निवृत्त कमांडर गौरी शर्मा यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे.
रियान आता प्रोफेशनल सायकलिस्ट्समध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. प्रसिद्ध सायकलिस्ट जिम सत्याने रियानचे कौतुक केले आहे. रियान, द लायन सायकल चालविण्याबद्दलचा ध्यास आणि समर्पणाचा प्रतीक आहे. तो, प्रत्येक वीकेंडमध्ये 100 किलोमीटर सायकल चालविणाऱया प्रोफेशनल सायकलिस्ट्समध्ये दिसून येईल असे सत्या यांनी म्हटले आहे.
सायकल चालविताना मला त्याचा वेग सर्वाधिक पसंत आहे. मी आठवडय़ातील तीन दिवस सायकल चालविण्याचा सराव करतो आणि उर्वरित दिवसांमध्ये स्वतःची क्षमता वाढविण्यावर काम करत असल्याचे रियानने सांगितले आहे. रियान आता 200 किमी ब्रेवेट्स डी रँडोन्यूर्समध्ये भाग घेऊ इच्छितो. फ्रान्समध्ये वार्षिक सायकल शर्यत टूर डी फ्रान्समध्ये भाग घेण्याचे त्याचे स्वप्न आहे.
तदेज पोगाकर, ज्युलियन अलाफिलिप आणि मार्क कॅवेंडिश यासारख्या दिग्गज सायकलिस्ट्सना आदर्श मानत असल्याचे तो सांगतो. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यासोबत सायकल चालविण्याची त्यांची इच्छा आहे. जर तुम्ही कठोर मेहनत आणि भरपूर अभ्यास करत असाल तर तुम्हाला उत्कृष्ट होण्यापासून कुणीच रोखू शकत नसल्याचा संदेश रियानने दिला आहे.