शाळा – शिक्षकांचा ताण वाढणार : विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभण्याची आशा : सामाजिक अंतर राखण्याची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनानंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. 9 वी ते 10 वी बरोबरच सोमवार दि. 22 फेब्रुवारीपासून इ. 6 वी ते 8 वीचे वर्ग देखील पूर्णवेळ भरणार आहेत. यामुळे माध्यमिक स्तर प्रत्यक्ष शिक्षण प्रणालीमध्ये ऑफलाईन कार्यरत होणार आहे. विद्यागम अंतर्गत इ. 6 वी ते 8 वीच्या शाळांचे वर्ग एक दिवसाआड सुरू होते. मात्र सोमवारपासून पूर्णवेळ शाळा गजबजणार आहेत. कोरोनाच्या संकटछायेनंतर सर्व परिस्थिती सुरळीत होत असताना शाळा व शिक्षकांचा ताण वाढणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा विचार करता एस.टी.एस. प्रणालीनुसार इ. 6 वी ते 10 वीचे एकूण 1 लाख 87 हजार 379 विद्यार्थी आता ऑफलाईन शिक्षण घेणार आहेत.
2020-2021 या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. मात्र ऑनलाईन शिक्षण घेत वर्षभरापासून शाळा बंद असल्याने ऑफलाईन शिक्षणाला पसंती दर्शविली जात आहे.
इ. 6 वी ते 8 वी विद्यागम अंतर्गत एक दिवसाआड तर इ. 9 वी ते 10 वी दररोज शाळा भरत असली तरी विद्यार्थी पटसंख्या मात्र वाढत असल्याचे मत शाळांमधून व्यक्त होत आहे. यामुळे सोमवारपासून 6 वी ते 8 वीची शाळा दररोज भरणार असल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभेल अशी आशा व्यक्त होत
आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात एसटीएस प्रणालीनुसार विभागनिहाय इयत्तांची संख्या हजार दोन हजारच्या पुढे आहे. यामुळे शाळानिहाय अचूक व्यवस्थेत कोरोनाचे धोके ओळखत शाळा भरविण्याची गरज आहे. मात्र तरीदेखील पूर्ण वेळ शाळा भरणार असल्याने सामाजिक अंतर राखताना शाळा व्यवस्थापनाबरोबरच शिक्षक, विद्यार्थी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाने इ. 1 ली ते 5 वीच्या निर्णयाचा विचार सुरू असल्याचे जाहीर केले असले तरी इ. 6 वी ते 10 वीची प्रत्यक्ष शैक्षणिक वारी सुरू होणार आहे.
तालुकानिहाय इ. 6 वी ते 8 वी ची विद्यार्थी संख्या
शैक्षणिक तालुके | इ. 6 वी | इ. 7 वी | इ. 8 वी |
बैलहोंगल | 4497 | 4569 | 4393 |
बेळगाव शहर | 9419 | 9380 | 9381 |
बेळगाव ग्रामीण | 7238 | 7184 | 6522 |
खानापूर | 3908 | 4243 | 4012 |
कित्तूर | 2054 | 2026 | 2003 |
रामदुर्ग | 5220 | 4860 | 4714 |
सौंदत्ती | 6689 | 6613 | 5858 |