पुण्याच्या ठक महिलेकडून फसवणूक; फसलेले आष्टयाचे; सोशल मिडीयातून केली जाहिरात
इस्लामपूर प्रतिनिधी
शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करुन अधिक मोबदला मिळवून देतो म्हणून वाळवा तालुक्यातील आष्टा येथील विजय शिवाजी फसाले (54, रा. डांगे कॉलेज जवळ) यांची 5 लाख 83 हजार 500 रुपयांची एका महिलेसह एका अज्ञाताने फसवणूक केली. ही घटना दि. 22 जानेवारी ते दि. 15 मार्च 2022 च्या दरम्यान घडली.
श्रेया (मिताली चंदेल) प्रकाश सिंग (रा. पुणे) असे संशयीत महिला आरोपीचे नाव आहे. फसाले यांच्या फेसबुक अकौंटवर शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुक करा, जादा नफा मिळेल, अशी जाहीरात आली होती. त्यावर असणाऱ्या नंबरवर फसाले यांनी संपर्क केला व मला गुंतवणूक करायची आहे, असे कळवले. प्रॉपीट मार्ट फायनाशियल सर्व्हिस लिमिटेड या शेअर्स मार्केटमधील महिला श्रेया सिंग हिने फसाले यांना फोन करुन इस्लामपूर येथील बालाजी लॉज येथे सेमिनार असल्याचे कळवले. दरम्यान दि. 22 जानेवारी रोजी फसाले व त्यांचा मित्र बाजीराव धोंडिराम करे (40, इस्लामपूर) बालाजी लॉजवर सेमिनारसाठी गेले. पण तेथे कोणीच उपस्थित नव्हते.
दरम्यान, लॉजच्या बाहेरच श्रेया सिंग हिने प्रॉपीट मार्ट सर्व्हिस लिमिटेड या शेअर्स मध्ये पैसे गुंतवल्यावर तुम्हाला चांगला फायदा होईल, असे सांगितले. यावर फसाले व त्यांच्या मित्रांनी विश्वास ठेवला. त्यावेळी श्रेया सिंग हिला 60 हजार रुपये रोख दिले. त्यावेळी श्रेया सिंग हिने अधिक पैसे गुंतवा तुम्हाला अधिक फायदा मिळेल, असा विश्वास दिला. त्यानंतर वारंवार फोन करुन ती पैसे गुंतवण्यास सांगत होती. त्यानंतर तिने फसाले यांना स्कीम सांगितली. तीन लाख रुपये भरा, तुम्हास दररोज 25 हजार रुपये मिळतील व फक्त रविवारी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, अशी माहिती दिली. त्यानंतर श्रेया सिंग हिने फसाले यांना 27 जानेवारी रोजी सातारा येथील कणसे ढाबा येथे बोलवून पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यावेळी फसाले यांनी 2 लाख 40 हजार रुपये रक्कम दिली. दरम्यान या महिलेने फसाले यांना 8 दिवसात 4 लाख 25 हजार रुपये मिळतील, असे सांगितले.
दरम्यान दि. 4 फेब्रुवारी रोजी श्रेया सिंग हिने फसाले यांना फोन करुन तुमचे पैसे हवे असतील तर अजून पैसे भरावे लागतील. नाहीतर तुमचे पैसे बुडतील असे सांगितले. त्यानंतर फसाले यांनी तिच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यावरुन 49 हजार रुपये पाठवले. त्यानंतर फसाले यांनी ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर दि. 15 फेब्रुवारी रोजी 39 हजार 500 रुपये, दि. 21 व 25 फेब्रुवारी रोजी 55 हजार व 60 हजार रुपये असे एकूण 1 लाख 15 हजार पाठवले. तसेच इस्लामपूर येथील एचडीएफसी बँक शाखेतून दि. 15 मार्च रोजी 80 हजार रुपये त्या महिलेच्या खात्यावर पाठवले. असे एकूण 5 लाख 83 हजार 500 रुपये वेळोवेळी पाठवले होते. फसाले यांना कसलाच परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. या प्रकरणी फसाले यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.