वसतिगृहातील विद्यार्थिनीचे प्रियकराच्या दबावातून कृत्य
पंजाबमधील प्रकरणानंतर संशयित तरुणी पोलिसांच्या जाळय़ात
मोहाली / वृत्तसंस्था
पंजाबमधील मोहाली येथे चंदीगड युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील स्नान करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याच विद्यापिठातील एका विद्यार्थिनीनेच इतर सहकारी विद्यार्थिनींचा स्नान करताना व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेत तिची अधिक चौकशी सुरू केली आहे. 50 ते 60 जणांच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आरोपी विद्यार्थिनीचे आपण बॉयप्रेन्डच्या दबावाखाली व्हिडीओ बनवल्याची बाब मान्य केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे.
मोहालीत चंदीगड युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले. धक्कादायक म्हणजे याच विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने जवळपास 60 विद्यार्थिंनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शिमल्यात राहणाऱया एका मित्राला पाठवले होते. या निंदाजनक प्रकारानंतर काही संबंधित तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा होती. मात्र, पोलिसांनी याबाबत खुलासा करत कोणत्याही तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला नसल्याचे स्पष्ट केले. तरीही एकंदर या संपूर्ण प्रकरणामुळे पंजाबमधील वातावरण बिघडल्याचे दिसून येत आहे. पंजाबमध्ये शनिवारी रात्री उघड झालेल्या या प्रकारानंतर विद्यापीठाच्या परिसरात जमावाने प्रचंड गोंधळ घातला. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाला गंभीरपणे घेतले नव्हते. मात्र, जमावाच्या वाढत्या दबावानंतर व्हिडीओ बनवणाऱया विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संशयित तरुणी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणावरून विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ घातला. यानंतर एमएमएस बनवणाऱया तरुणीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी व्हिडीओ बनवणाऱया तरुणीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आरोपी तरुणी अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींचे स्नान करतानाचा व्हिडीओ बनवत होती आणि आपल्या ओळखीच्या तरुणाला (बॉयप्रेन्ड) पाठवत होती. या तरुणाने हे व्हिडीओ इंटरनेटवर टाकले होते. त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल झाल्याचे प्राथमिक टप्प्यातील तपासाअंती स्पष्ट झाले आहे.
संशयित तरुणीसह बॉयप्रेन्डवर गुन्हा
व्हिडीओ लीक प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर आल्यानंतर तरुणीने आपल्या मोबाईलमधून अश्लील फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले. वसतिगृह व्यवस्थापनाने मुलीच्या मोबाईलवरून तिच्या सहकारी मुलाला प्रश्न विचारला असता त्याने अश्लील व्हिडीओचा स्क्रीनशॉट पाठवला. यानंतर विद्यापीठ व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनी आणि तिचा शिमला येथील साथीदार सनी विरुद्ध आयपीसी कलम 354-सी आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दाखल झालेल्या पोलीस एफआयआरनुसार, शनिवारी दुपारी काही मुलींनी व्हिडीओ चित्रीकरणाचा संशय आल्याने वसतिगृहातील वॉर्डन राजविंदर कौर यांच्याकडे तक्रार केली होती. याप्रकरणी वॉर्डन राजविंदर कौर यांनी संशयित मुलीची चौकशी केल्यानंतर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृह व्यवस्थापक रितू यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर अधिक तपास सुरू आणि चौकशी सुरू केल्यानंतर हे प्रकरण व्यापक असल्याचे दिसून आले. आरोपी विद्यार्थिनीच्या मोबाईलवर सतत कॉल आणि मेसेज येत असल्यामुळे मॅनेजरला तिच्यावर संशय आला. अखेरीस आरोपी विद्यार्थिनीने सर्व बाबींची कबुली दिली. खात्री झाल्यानंतर व्यवस्थापकाने याबाबत पोलिसांत तक्रार केली.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित
चंदीगड विद्यापीठातील घटनेप्रकरणी पंजाब पोलिसांनी केलेली कारवाई संशयाच्या भोवऱयात अडकलेली दिसते. एकीकडे वसतिगृह व्यवस्थापकांनी संबंधित तरुणीने आरोप मान्य केल्याचे सांगितले आहे. मात्र, पोलिसांनी अनेक मुलींबाबत असा प्रकार घडल्याचा इन्कार केला होता. आरोपी मुलाने अश्लील व्हिडीओंचे स्क्रीनशॉटही पाठवले. असे असूनही एसएसपी विवेकशील सोनी यांनी तरुणीने फक्त स्वतःचा व्हिडीओ बनवला आहे. तेच पाठवले होते, असे स्पष्टीकरण दिल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली. मात्र, सर्व पैलू तपासले जात असल्याचा दावाही पोलीस यंत्रणेने केला आहे.
विद्यार्थिनींचा संताप, वसतिगृहाबाहेर आंदोलन
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठातील तरुणी संतापल्या आहेत. रविवारी सायंकाळी शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये पुन्हा निदर्शने सुरू केली. तसेच जमावाने डीन कार्यालयाला घेराव घातला. वसतिगृहात सुरक्षित वाटत नसल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. वसतिगृह प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच वसतिगृह प्रशासनाने प्रसारमाध्यम आणि पोलिसांना पैसे देऊन परत पाठवल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. आरोपी तरुणी सर्वांसमोर आपली चूक कबूल करणार होती, मात्र प्रशासनाने हे होऊ दिले नसल्याचा दावाही काही आंदोलक विद्यार्थिनींनी केला. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि वसतिगृह परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
संशयित तरुणीच्या प्रियकरालाही अटक
आरोपी तरुणीनंतर पोलिसांनी तिच्या प्रियकरालाही अटक केली आहे. सनी असे आरोपी तरुणाचे नाव असून तो शिमलातील रोहरू येथील रहिवासी आहे. दोघेही एकमेकांना गेल्या बऱयाच दिवसांपासून ओळखतात. आरोपी विद्यार्थिनीने आपण बॉयप्रेन्डच्या दबावाखाली व्हिडीओ बनवल्याची बाब मान्य केली आहे. मात्र, तिने सनीला पाठविलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल कसे झाले याबाबतचा तपास आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे.