केंद्रीय महिला-बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांची घोषणा
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय महिला – बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांनी गोवा राज्यासाठी 60 अंगणवाडींची घोषणा केली असून दक्षिण गोवा जिह्यासाठी एक मदत केंद्रही जाहीर केले आहे. गोव्याचे महिला बाल विकासमंत्री विश्वजित राणे यांनी त्यांचे स्वागत केले असून गोव्याला त्याचा खूप मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय महिला – बाल विकास खात्याची विभागीय बैठक गोव्यात घेण्यात आली. त्यावेळी इराणी यांनी वरील माहिती दिली. गोव्यातील प्रत्येक ब्लॉकसाठी 2 अंगणवाडी मिळणार असून दक्षिण गोव्यातील मदत केंद्रातून गरजूंना साहाय्य केले जाणार आहे.
महिला, बालकांचे सशक्तीकरण
सन 2014 पूर्वी सॅनिटरी पॅडबाबत कोणच बोलत नव्हते आणि केंद्र सरकारनेही काही केले नव्हते परंतु मोदी सरकारने त्याची दखल घेऊन कार्यवाही केली. महिला – बालकांचे सशक्तीकरण झाले तरच देशाचा खऱया अर्थाने विकास होईल असे केंद्राचे धोरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंदीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड व गोवा, महाराष्ट्र, दादरा – नगर – हवेली, दमण-दिव येथील महिला बालविकास खात्यांचे सचिव, मंत्री बैठकीस उपस्थित होते. महिलांचे तसेच बालकांचे प्रश्न तसेच विविध योजनांवर बैठकीत चर्चा झाली.
700 अंगणवाडी भाडय़ाच्या जागेत
राज्यात सुमारे 700 अंगणवाडी भाडय़ाच्या जागेत कार्यरत असून त्यांना जागेची टंचाई भासत आहे. त्यांना स्वतंत्र जागा मिळवून देण्यासाठी खाते प्रयत्नशील आहे. काही प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्याची योजना असल्याचे राणे म्हणाले.