नीरज चोप्राच्या ऐतिहासिक सुवर्णपदकाच्या सन्मानार्थ अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनचा निर्णय, देशभरात भालाफेक प्रसारासाठी विविध उपक्रमही राबवणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले, तो 7 ऑगस्टचा दिवस यापुढे भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या वतीने ‘भालाफेक दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. 23 वर्षीय नीरज चोप्रा मागील शनिवारी वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा केवळ दुसरा भारतीय ठरला. नीरजने त्यावेळी 87.58 मीटर्सचा सर्वोत्तम थ्रो करत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती.
‘पूर्ण देशभरात भालाफेकीचा प्रसार व्हावा, यासाठी आम्ही 7 ऑगस्ट हा भालाफेक दिवस म्हणून साजरा करणार आहोत. पुढील वर्षापासून आमच्या सर्व संलग्न संघटना भालाफेक स्पर्धांचे आयोजन करतील’, असे भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशन नियोजन समितीचे अध्यक्ष ललित भानोत म्हणाले. नीरज चोप्रासह सर्व भारतीय ऍथलिट्सचा सन्मान केला गेला, त्यावेळी ते बोलत होते.
‘भालाफेक हा राष्ट्रीय इव्हेंट व्हावा, यासाठी आमचे हरसंभव प्रयत्न असणार आहेत. यासाठी आम्ही आंतरजिल्हा स्पर्धा भरवणार आहोत. यासाठी लागणारे भाले देखील पुरवले जातील. पुढील काही वर्षात सातत्याने भालाफेक स्पर्धा भरवण्यावर आमचा भर असेल’, याचा त्यांनी येथे पुढे उल्लेख केला.
भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने यापूर्वी 2018 मध्ये राष्ट्रीय खुली भालाफेक स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेची तिसरी आवृत्ती यंदा ऑक्टोबरमध्ये भरवली जाणार आहे. या उपक्रमाची त्यांनी येथे माहिती दिली.
जर मुलांना भाले मिळत असतील, अन्य सुविधा उपलब्ध होत असतील तर ते या खेळाकडे वळतील, असेही ते म्हणाले. नीरजचे वडील सतीश, आई सरोज देवी याप्रसंगी उपस्थित होते. नीरज खटय़ाळ असला तरी तो मेहनती राहिला, याचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, ‘वो सही है, मगर नीरज जो भी काम करता है, मन लगा के करता है. लेकिन हम क्या जाने, वह एक दिन ऐसा करेगा, देश को रोशन करेगा’!
रोप-वेची फेरी मोफत, हेअर कटिंग मोफत, पेट्रोलही मोफत…फक्त नाव नीरज असायला हवे!
नीरज चोप्राने ऑलिम्पिक सुवर्ण जिंकल्यानंतर गुजरातमध्ये सध्या नीरज या नावाची बरीच धूम आहे. नीरजने स्वतःची मेहनत सार्थ ठरवली. शिवाय, नीरज नाव असलेल्या गुजरातवासियांचीही आता चैन सुरु झाली आहे. या राज्यात काही ठिकाणी नीरज नाव असलेल्या व्यक्तींना रोप-वेची फेरी मोफत दिली जात आहे, हेअर कटिंग मोफत करुन दिले जात आहे, इतकेच नव्हे तर काही पेट्रोल पंपांवर 501 रुपयांचे पेट्रोलही मोफत दिले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, जुनागढ येथील गिरनार रोप-वेवर नीरज नाव असलेल्या व्यक्तींना कोणतेही शुल्क आता आकारले जात नाही. उषा ब्रेको कंपनीने दि. 20 ऑगस्टपर्यंत ओळखपत्र आणणाऱया नीरज या नावाच्या सर्व व्यक्तींना रोप-वेची फेरी मोफत असेल, असे जाहीर केले आहे. हा रोप-वे देशातील सर्वाधिक अंतराचा मानला जातो. या रोप-वे च्या एकेरी फेरीसाठी 400 रुपये तर पूर्ण फेरीसाठी 700 रुपये शुल्क आकारले जाते. गिरनार पर्वतावर स्थित अंबामाताजी दर्शनासाठी यापूर्वी 9999 पायऱया चढून जावे लागत असे.
याशिवाय, भडोच येथील एसपी पेट्रोल पंपने ओळखपत्र दाखवणाऱया नीरज नावाच्या वाहनधारकांना 501 रुपयांचे पेट्रोल मोफत देत असल्याची घोषणा केली असून यामुळे नीरज नावाच्या व्यक्तींची इथे बरीच गर्दी होत आहे. एकंदरीत येथे बरेच काही मोफत मिळेल. फक्त नाव नीरज असायला हवे!
चोप्रा म्हणतो, तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट!
2015 मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत पाचव्या स्थानी येऊनही अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने माझा राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात समावेश केला, तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला, असे नीरजने येथे नमूद केले. राष्ट्रीय शिबिरात दाखल होण्यापूर्वी नीरज पंचकुला येथील ताऊ देवी लाल स्टेडियमवर सराव करत होता. नंतर तो पानिपतमधील शिवाजी स्टेडियमवर दाखल झाला.
भारतीय ऍथलेटिक्सच्या इतिहासातील हा सर्वात अभिमानास्पद क्षण आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, यापेक्षा आणखी सरस काहीच असू शकत नाही. नीरजच्या या सुवर्णपदकामुळे देशभरातील सर्व मुलांना ऍथलेटिक्सकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी आशा वाटते.
-ऍथलेटिक्स फेडरेशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षा अंजू बॉबी जॉर्ज
ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर नीरजचे आता वर्ल्ड चॅम्पियनशिपवर लक्ष
ऑलिम्पिकमध्ये संस्मरणीय सुवर्ण जिंकल्यानंतर नीरज चोप्राने आता वर्ल्ड चॅम्पियनशिपचे टायटल जिंकण्यावर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले आहे.
यापुढील ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 15 ते 24 जुलै 2022 या कालावधीत अमेरिकन भूमीत होणार आहे. पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे वर्ल्ड चॅम्पियनशिप यंदाच अमेरिकेत होणे अपेक्षित होते. मात्र, कोव्हिड-19 मुळे ते वर्षभराच्या कालावधीने लांबणीवर टाकले गेले आहे.
‘मी आशियाई व राष्ट्रकुल सुवर्ण यापूर्वी जिंकले आहे आणि आता ऑलिम्पिक सुवर्णपदकावर देखील मोहोर उमटवली. यापुढे वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्ण जिंकणे, हे माझे लक्ष्य असेल’, असे नीरज येथे म्हणाला. भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
‘वर्ल्ड चॅम्पियनशिप देखील महत्त्वाची स्पर्धा असते आणि काही वेळा त्यात ऑलिम्पिकपेक्षाही अधिक तगडी चुरस रंगू शकते. मला फक्त ऑलिम्पिक सुवर्णपदकावरच संतुष्ट रहायचे नाही. आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिकमध्ये आणखी एकदा सुवर्ण जिंकण्याचे माझे प्रयत्न असतील’, असे तो म्हणाला.