भीतीमुळे लोकांनी घेतली रस्त्यांवर धाव
वृत्तसंस्था /मेक्सिको सिटी
मेक्सिको या देशात मंगळवारी रात्री अधिक तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.0 इतकी होती. भूकंपाची तीव्रता अधिक असल्याने लोक घाबरून स्वतःच्या कुटुंबांसोबत रस्त्यांवर उतरले. या भूकंपात कुठलीच जीवितहानी झालेली नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
भूकंपाचा सर्वाधिक प्रभाव गुएरेरो राज्याच्या एकापुल्कोमध्ये दिसून आला आहे. तेथे वृक्ष उन्मळून पडले असून इमारतींची पडझड झाली आहे. तसेच वीजसेवा ठप्प झाली आहे. दहशतीमुळे लोकांनी रात्र रस्त्यांवरच घालविली आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पर्वत देखील हलले आणि अनेक घरांना नुकसान पोहोचल्याचे उद्गार पंतप्रधान मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी काढले आहेत.
भूकंपाची तीव्रता पाहता त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मेक्सिकोत सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत. या भूकंपापूर्वी मेक्सिको भीषण पूरसंकटाला तोंड देत होता. हिडाल्गो राज्यात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुराने अनेक जणांचा जीव घेतला आहे.
मेक्सिकोत 19 सप्टेंबर 2017 रोजी 11.45 वाजता भूकंप झाला होता. याची तीव्रता 7.1 इतकी होती आणि या भूकंपात 370 बळी गेले होते. या भूकंपाच्या 32 वर्षांपूर्वी (19 सप्टेंबर 1958) 8 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपामुळे सुमारे 10 हजार जणांना जीव गमवावा लागला होता.