टोकियो / वृत्तसंस्था
जपानला बुधवारी रात्री भूकंपाचा मोठा धक्का बसला. राजधानी टोकियोसह अनेक शहरांमध्ये त्याचा परिणाम दिसून आला. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 7.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.06 वाजता (जपानच्या वेळेनुसार रात्री 11ः36 वाजता) जाणवलेल्या जोरदार धक्क्यांमुळे लोकांना घराबाहेर पडावे लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू फुकुशिमा परिसरात सुमारे 60 किमी खोलवर होता. जपानच्या ईशान्य किनारपट्टी भागात ही घटना घडली असून त्सुनामीचा इशारा देण्यात आला. याचदरम्यान घबराट पसरल्याने लोकांची धावपळ सुरू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. काही प्रमाणात घरे-इमारतींची पडझड झाली असली तरी मोठी जीवितहानी झाल्याची माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकली नाही. धोका टाळण्यासाठी काही भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सुमारे 20 लाख घरांमधील बत्ती गुल झाल्याचा दावा ‘जपान टाईम्स’ने केला आहे. सरकारकडून एकंदर परिस्थितीवर नजर ठेवण्यात येत आहे. सरकारकडून लोकांना एक विशेष सूचना जारी करण्यात आली. काही समुद्रात एक मीटरपर्यंत लाटा उसळल्या.
आता धक्के जाणवलेल्या भागामध्येच 2011 मध्ये मोठा भूकंप झाल्यानंतर त्सुनामी आली होती. त्या दुर्घटनेत फुकुशिमा आण्विक आपत्ती घडली. त्यानंतर आलेल्या त्सुनामीत 18 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे पाच लाख लोक बेघर झाले. या दुर्घटनेला 10 वर्षे उलटल्यानंतरही फुकुशिमाच्या आसपासचे हजारो लोक अजूनही आपल्या घरी परतू शकलेले नाहीत.