शाहूपुरी पोलिसांची कारवाई, तिघांना अटक
प्रतिनिधी/कोल्हापूर
स्टेशनरोडवरील हॉटेलच्या बेसमेंटमध्ये गांजा विक्री करणाऱया दुकानावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी तिघा जणांना अटक करुन त्यांच्याकडून 7 किलो 895 ग्रॅम गांजा, 1 मोबाईल असा सुमारे 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरात विक्री करण्यासाठी हा गांजा आणला गेला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
मन्सूर मुनीर शेख (वय 37, रा.351, ई वॉर्ड, स्टेशन रोड शाहुपूरी), रोहीत मनोज चव्हाण (वय 23, रा. जागृती नगर), प्रथमेश विजय डबाणे (वय 24, रा.लाईन बाजार कसबा बावडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हे ही वाचा : अंकिताच्या शवविच्छेदन अहवालानंतर अंत्यसंस्कार थांबवले; पुन्हा पोस्टमार्टम करण्याची मागणी
याबाबत अधीक माहिती अशी की, स्टेशनरोडवरील एका हॉटेलच्या तळमजल्यावर फिश वर्ल्ड अँड पेट शॉप आहे. या ठिकाणी गांजा असल्याची माहिती शाहुपूरी पोलिसांना मिळाली होती. यानुसार शनिवारी सायंकाळी शाहूपुरी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी येथे 7 किलो 895 ग्रँम गांजा मिळाला. या प्रकरणी मन्सूर शेख, रोहीत चव्हाण, प्रथमेश डबाणे यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांना रविवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या तिघांनी हा गांजा कोठून आणला, त्याची विक्री कोठे होणार होती याची माहिती पोलिस घेत आहेत.