दुसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल : सबळ पुराव्याअभावी सर्वांची मुक्तता
प्रतिनिधी / बेळगाव
अमलीपदार्थ बाळगलेल्या सात आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आणि साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्देष मुक्तता केली आहे. गौस सलीम बिडी (रा. गँगवाडी), समीर पठाण (रा. शिवाजीनगर), प्रकाश गंगारेड्डी (रा. अंजनेयनगर), खताल पाडेगार (रा. रुक्मिणीनगर), बाबू कुल्लूर (रा. न्यू गांधीनगर), विक्की माळगे (रा. वीरभद्रनगर), फैज किल्लेदार (रा. आझादनगर) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.
धर्मनाथ सर्कलजवळ संशयित आरोपी गौस बिडी आणि इतर सहा जणांकडे अमलीपदार्थ असल्याची माहिती माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर यांना मिळाली. यानंतर त्यांनी धाड टाकून सात जणांना गांजासहीत अटक केली होती. त्यांच्याकडून 1 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त केला होता. त्यानंतर पंचनामादेखील करण्यात आला
होता.
माळमारुती पोलीस स्थानकामध्ये या सर्व संशयितांवर कलम 20(ब), अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी येथील दुसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये झाली. त्या ठिकाणी साक्षीदारातील विसंगती आणि सबळ पुराव्याअभावी या सर्वांची न्यायाधीश हर्षा ए. यांनी निर्दोष मुक्तता केली
आहे.
28 कागदोपत्री पुरावे तपासले
सरकारी पक्षाच्यावतीने सात साक्षीदार, चार मुद्देमाल, 28 कागदोपत्री पुरावे तपासण्यात आले. संशयितांच्यावतीने ऍड. प्रताप यादव, ऍड. हेमराज बेंचण्णावर, ऍड. महादेव कामगौडा व ऍड. आर. के. हंशी यांनी काम पाहिले.