Tarun Bharat

भीषण अपघातात 7 कामगार ठार

Advertisements

बेळगाव-गोकाक रोडवरील कल्लाळ पुलावर क्रूझर उलटून दुर्घटना : 13 जण जखमी : बेळगावला येताना काळाचा घाला

प्रतिनिधी /बेळगाव

चालकाचे नियंत्रण सुटून क्रूझर उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात सात कामगार जागीच ठार तर 13 जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी बेळगाव-गोकाक रोडवरील कल्लाळ पुलावर ही भीषण दुर्घटना घडली आहे.

गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ परिसरातून मजुरीसाठी बेळगावला येणाऱया कामगारांवर क्रूर काळाने घाला घातला आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी प्रत्येकी सात लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. रविवारी सुटीचा दिवस असूनही हे कामगार कामासाठी घराबाहेर पडले होते. त्यांच्यासाठी रविवारचा दिवस ‘घातवार’ ठरला.

रविवार दि. 26 रोजी सकाळी 8.15 च्या सुमारास ही घटना घडली आहे. 12 जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून एका तरुणाला केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात हलविण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरटीओ प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम व त्यांच्या सहकाऱयांनी पाहणी केली. गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ, दासनट्टी, लगमेश्वर परिसरातून तीन क्रूझरमधून कामगार बेळगावला येत होते. यापैकी केए 49 एम 1037 क्रमांकाची क्रूझर कल्लाळ पुलावरून उलटली. दोन पलटी खाऊन क्रूझर पुलाखाली कोसळली. क्रूझरखाली सापडून सात कामगार जागीच ठार झाले. यापैकी काही जणांचे चेहरे चिरडले होते. त्यांची ओळख पटविणेही कठीण जात होते. अंगावरील कपडय़ावरून शवागारात त्यांची ओळख पटविण्यात आली. अडव्याप्पा शिवाप्पा सजली ऊर्फ चिलभावी (वय 37), बसवराज चंद्रप्पा दळवी (वय 34), बसनगौडा बसलिंगप्पा हनमन्नवर (वय 51), आकाश रामन्ना गस्ती (वय 22), फकिरप्पा रानाप्पा हरिजन (वय 55 सर्व जण रा. अक्कतंगेरहाळ), बसवराज रामप्पा सनदी (वय 40 रा. मल्लापूर), कृष्णा रामप्पा खंडुरी (वय 36 रा. दासनट्टी) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी कामगारांची नावे आहेत.

कांतेश माळगी (वय 22), राजू कणकुंबी (वय 32), रामचंद्र बिचगत्ती (वय 35), चालक भिमप्पा कुंदरगी (वय 31), लगमप्पा वालीगार (वय 30), परशराम पाटील (वय 24), दुर्गाप्पा चिलभावी (वय 20), आनंद खंडुरी (वय 31), रुद्राप्पा खंडुरी (वय 40), रुद्राप्पा पाटील (वय 25), शिवानंद मुसलमारी (वय 34), किरण कळसण्णवर (वय 31), उळवप्पा बड्डीमनी (वय 60) अशी जखमींची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ, दासनट्टी, लगमेश्वर येथील कामगार कामानिमित्त रविवारी सकाळी तीन क्रूझरमधून बेळगावला येत होते. अपघातग्रस्त क्रूझर मध्ये होता. लवकर बेळगावला पोहोचण्याच्या घाईत वाहनाचा वेग वाढविला. पुलावर नियंत्रण सुटून हा अपघात घडला आहे.

गोकाक तालुक्यातील वेगवेगळय़ा गावातून कामगार रोज बेळगावला येतात. काही जण सांबरा, बेळगाव परिसरात सुरू असलेल्या रेल्वेच्या कामासाठी येतात. तर काही जण देसूरजवळील गोदामात काम करतात. आणखी काही जण बेळगावात गवंडी काम करतात. वेगवेगळय़ा ठिकाणी मजुरी करण्यासाठी हे कामगार वाहनातून येतात. रविवारी सकाळी अपघात झालेल्या क्रूझरमध्ये 21 कामगार प्रवास करीत होते.

अपघातात सात जण जागीच ठार झाले असून 13 कामगार जखमी झाले आहेत. जखमीपैकी दोघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच मारिहाळचे पोलीस निरीक्षक महांतेश बसापूर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना इस्पितळात हलविण्यासाठी 10 रुग्णवाहिका मागविण्यात आल्या. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त क्रूझर बाहेर काढण्यात आले.

घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. क्रूझर अंगावर पडल्याने अनेकांचे हात-पाय मोडले आहेत. जेवणाचे डब्बे अस्तव्यस्थ पडले होते. सुरुवातीला क्रूझर उचलून त्याखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. काही जण क्रूझरमधून बाहेर फेकले गेले होते. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

दुपारी सर्व मृतदेहांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करण्यात आली. यासाठी एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांचे सहकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून होते. रविवारी खासगी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री बसवराज बोम्माई बेळगाव दौऱयावर आले होते. त्याचवेळी हा अपघात घडला आहे. जखमींची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री सिव्हिल हॉस्पिटलला भेट देणार अशी माहिती मिळाली होती. मात्र, मुख्यमंत्री सिव्हिलला आले नाहीत. याचवेळी काँग्रेसचे नेते मलगौडा पाटील, एम. जे. प्रदीप आदींनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने मदत करण्याची मागणी केली आहे.

चालक बचावला

पूझरचालक भिमप्पा मल्लाप्पा कुंदरगी (वय 30 रा. अक्कतंगेरहाळ) हा या अपघातातून बचावला आहे. कल्लाळ पुलाच्या कठडय़ाला धडक देऊन उलटणाऱया पूझरमधून त्याने उडी घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. क्रूझरचा मालक व चालक भिमप्पाच असल्याचे सांगण्यात आले.

प्रादेशिक आयुक्तांनी घेतली धाव

रुग्णवाहिकेतून रविवारी सकाळी 9.15 वाजता सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक आयुक्त आमलान आदित्य बिस्वास यांनी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला धाव घेतली. सकाळी काऊंटर व आपत्कालीन विभागात कर्मचाऱयांची संख्या कमी होती. प्रादेशिक आयुक्त दाखल होताच वैद्यकीय कर्मचाऱयांना बोलावून घेण्यात आले.

कुटुंबीयांचा आक्रोश

सिव्हिल हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभाग व मृतदेह ठेवण्यात आलेल्या शवागाराबाहेर कुटुंबीयांचा एकच आक्रोश सुरू होता. मोलमजुरीसाठी घराबाहेर पडलेले कामगार घरी परतले नाहीत. क्रूर काळाने त्यांच्यावर घाला घातला. या धक्क्यामुळे सारा परिसर सुन्न झाला होता.

कामाचा पहिला दिवस

अपघातात मृत्युमुखी पडलेला बसवराज हा रविवारी पहिल्यांदाच कामासाठी बाहेर पडला होता. गावात रिकामे फिरण्यापेक्षा कामावर गेलेले बरे म्हणून तो क्रूझरमधून बेळगावला येत होता. बेळगावला पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी उत्तरीय तपासणीनंतर सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पाच कामगारांचे मृतदेह अक्कतंगेरहाळला नेण्यात आले.

मुख्यमंत्र्यांकडून भरपाई जाहीर

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी पाच लाख व जिल्हाधिकारी निधीतून दोन लाख रुपये अशी प्रत्येकी 7 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यामध्ये पाच बांधकाम कामगार आहेत. कामगार खात्याकडून त्यांना आणखी पाच लाख रुपये भरपाई देण्यासंबंधी सूचना केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अपघातात कामगारांचा मृत्यू झाला आहे. याचे आपल्याला दुःख झाले आहे. या अपघातातील जखमींवर उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री उमेश कत्ती, भैरती बसवराज, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर  उपस्थित होत्या.

Related Stories

उड्डाणपुलावरील दुसऱया बाजूच्या रस्त्याची दुरुस्ती सुरू

Patil_p

काकती-होनगा परिसरात पावसाची सलामी

Amit Kulkarni

न्यायालये 1 तारखेपासून सुरू होणार

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही खबरदारी

Patil_p

शहरात पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा

Patil_p

मेंढपाळाचा मुलगा बनला तहसीलदार

Patil_p
error: Content is protected !!