उत्तरप्रदेशात सीबीआयकडून तपास सुरू : दिल्ली एम्समध्ये वैद्यकीय तपासणी
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशच्या बांदामध्ये 70 हून अधिक मुलांचे लैंगिक शोषण करणारा सिंचन विभागातील कनिष्ठ अभियंता रामभवन एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा संशय आहे. एचआयव्हीची लक्षणे आढळल्यावर त्याची तपासणी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात केली जात आहे.
70 हून अधिक मुलांचे लैंगिक शोषण करून आणि त्याच्या आक्षेपार्ह चित्रफिती तयार करून पॉर्न साइट्सवर विकणाऱया कनिष्ठ अभियंत्यासह सीबीआयचे पथक एम्समध्ये पोहोचले आहे. तेथील 8 डॉक्टरांचे पथक आरोपीची तपासणी करत आहे. त्याची मानसिक, एचआयव्ही आणि पीडोफाइल टेस्ट केली जात आहे. सिंचन विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंत्याला सीबीआयने अटक केली होती. तो 10 वर्षांपासून मुलांचे लैंगिक शोषण करत होता. याचबरोबर या घृणास्पद कृत्याचे चित्रिकरण करत होता. याची छायाचित्रे तसेच चित्रफिती तो पॉर्न साइट्सना विकत होता.
बुंदेलखंडमध्ये गुन्हय़ांचे केंद्र
कनिष्ठ अभियंत्याने बांदा, चित्रकूट आणि हमीरपूरमधील 5 ते 16 वर्षीय मुलांना स्वतःचे शिकार केले होते. हा प्रकार उघडकीस येताच आरोपीला त्वरित निलंबितही करण्यात आले होते.
असा झाला होता खुलासा
ऑनलाईन बाल लैंगिक शोषणाची प्रकरणे हाताळणाऱया सीबीआयच्या नवनियुक्त शाखेने इंटरनेटवर बाल अश्लील सामग्री प्रसारित करणाऱया लोकांवर नजर ठेवण्यास प्रारंभ केला होता. काही दिवसांपर्यंत आरोपीवर नजर ठेवल्यावर त्याच्या दुष्कृत्यांचा भांडाफोड केला होता.
दुष्कृत्यांचे साम्राज्य
आरोपी कनिष्ठ अभियंत्या 10 वर्षांपासून हे ‘दुष्कृत्यांचे साम्राज्य’ चालवत होता. आरोपी मुख्यत्वे मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री जगभरात संचालित पॉर्न साइट्सना उपलब्ध करत होता. या घृणास्पद कृत्यांना लपविण्यासाठी पीडित मुलांना पैसे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह अन्य गोष्टी देत होतो, असे आरोपीने चौकशीत सांगितले आहे.