भारताचे संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
संरक्षण मंत्रालयाने भारतीय संरक्षण दलांसाठी विविध शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी 70 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संरक्षण अधिग्रहण परिषदेची (डीएसी) बैठक झाली. यामध्ये देशाच्या स्थितीनुसार संरक्षण उपकरणांच्या खरेदीवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी देशाच्या तिन्ही सेना अधिक मजबूत करण्यासाठी कोटय़वधींच्या शस्त्रास्त्र उपकरणे खरेदीला हिरवा कंदील दाखविण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत भारतीय नौदलासाठी 60 मेड इन इंडिया युटिलिटी हेलिकॉप्टर, मरीन आणि ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे, 307 एटीजीएस हॉवित्झर तोफा, 9 एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर भारतीय लष्करासाठी खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. या करारामध्ये भारतीय नौदलासाठी ‘एचएएल’कडून 60 युएच सागरी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी 32,000 कोटी रुपयांच्या मेगा ऑर्डरचा समावेश आहे. या कराराशी संबंधित एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱयाने गुरुवारी ही माहिती दिली. संरक्षण अधिकाऱयाच्या म्हणण्यानुसार, ‘एटीएजीएस’च्या खरेदीला ‘डीएसी’ने मान्यता दिली आहे. हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. हे 155एमएम/52 कॅलिबर ‘एटीएजीएस’ ‘डीआरडीओ’द्वारे भारत फोर्ज आणि टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टम्स यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले गेले आहे. ही तोफ तैनात केली जाणारी ठिकाणी अतिउंचीवर आहेत. चीनसोबतच्या पाकिस्तानच्या सीमेवरही ते तैनात करण्यात येणार आहे. 2021 मध्ये या तोफेची 15 हजार फूट उंचीच्या परिसरात यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. ही उपकरणे भारतात बनवली जाणार असल्यामुळे गरजेनुसार त्यात बदलही करता येणार आहे. नौदलासाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्र, शक्ती ईडब्ल्यू प्रणाली आणि युटिलिटी हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. त्याची किंमत 56 हजार कोटी रुपये आहे. त्याचवेळी, भारतीय हवाई दलासाठी लाँग रेंज स्टँड-ऑफ वेपन मंजूर करण्यात आले असून ते सुखोई-30 मध्ये बसवले जाणार आहे.