कारवार-मंगळूर रस्त्यावर साकारला ऐतिहासिक लंडन ब्रीज : दोनपैकी एक वाहतुकीसाठी खुला : दुसऱ्या बोगद्याचे काम प्रगतीपथावर
पी. के. चापगावकर /कारवार
अनेक नैसर्गिक आणि भौगोलिक समस्यांवर यशस्वी मात करुन राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर (कारवार-मंगळूर) येथील ऐतिहासिक लंडन ब्रीज व बीणगा दरम्यान साकारण्यात आलेल्या सुमारे 700 मी. इतक्या लांबीच्या बोगद्याचे लोकार्पण शुक्रवारी कारवारचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारवार अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक, भटकळचे आमदार सुनील नाईक, कुमठाचे आमदार दीनकर शेट्टी, विधानपरिषद सदस्य गणपती उळवेकर, विधानपरिषद सदस्य शांताराम सिद्धी, नगराध्यक्ष डॉ. नितीन पिकळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष वेंकटेश नायक, एन. एस. हेगडे, नयना निलावर, जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.
कारवार-मंगळूर दरम्यानच्या राष्ट्रीय हमरस्ता 66 रुंदीकरणाचे काम आयआरबी या बांधकाम कंपनीने हाती घेतले आहे. कारवार ते बीणगा दरम्यानचा रस्ता अवघड आणि धोकादायक वळणांचा आहे. याच रस्त्यावर कारवार वाणिज्य बंदर वसलेले आहे. त्यामुळे येथे नेहमीच वाहनांची गर्दी असते. वळणे आणि वाहनांच्या गर्दीवर तोडगा म्हणून येथील लंडन ब्रीज ते बीणगापर्यंत दोन बोगदे (एक येण्यासाठी दुसरा जाण्यासाठी) तयार करण्याच्या कामाला आठ वर्षापूर्वी सुरुवात केली होती. त्यापैकी एक बोगदा (दक्षिणोत्तर) शुक्रवारी वाहतुकीला खुला केला. लंडन ब्रीजपासून अलीगद्दापर्यंत 350 मी. लांबीच्या व अलीगद्दापासून बीणगापर्यंत 346 मी. लांबीच्या बोगद्याचे काम मुंबई येथील कंपनीने पूर्ण केले आहे. यापूर्वी कारवारहून बीणगा येथे दाखल व्हायला 10 ते 15 मिनिटांचा कालावधी लागायचा तथापि आता बोगद्यामुळे येथून बीणग्याला पोहोचायला 4 ते 5 मिनिटाचा कालावधी पुरेसा आहे. या बोगद्यामुळे कारवार-बीणगा दरम्यानच्या अंतरात 4 ते 5 किमी इतकी घट झाली आहे.
किनारपट्टीवरील बोगद्याचे एकमेव ठिकाण
राज्याच्या किनारपट्टीवर (कारवार, उडुपी आणि मंगळूर जिल्ह्यात) कोकण रेल्वे मार्गावर अनेक बोगदे आहेत. तथापि राज्याच्या किनारपट्टीवरील रस्त्यावर कारवार-बीणगा हे बोगद्यांचे एकमेव ठिकाण. साहजीकपणे या बोगद्यातील प्रवासाबद्दल उत्कंठा लागून राहिली होती. भोगद्याच्या उत्तर टोकाला येथील नव्याने उभारलेला लंडन ब्रीज जोडलेला आहे. ब्रिटिशांनी बांधलेला ऐतिहासिक ब्रीज आता इतिहास जमा झाला आहे. ब्रीजला जोडून येथील आरटीओ कार्यालयापर्यंत जाणारा फ्लायओव्हर बांधण्यात आला आहे.
कारवारच्या सौंदर्यात भर घालणार
फ्लायओव्हरला समांतर असलेल्या अरबी समुद्राचे दृश्य या फ्लायओव्हरवरुन टिपता येणार आहे. परिणामी भविष्यात हा फ्लायओव्हर आणि बोगदा पर्यटन केंद्र बनून राहण्याची शक्यता आहे. कोट्यावधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेला बोगदा कारवारच्या सौंदर्यात भर घालणार आहे.
अनेक समस्यांवर मात करुन बोगदा निर्मिती
शक्तीशाली स्फोट घडवून या बोगद्याची निर्मिती करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कस लागला होता. पावसाच्या हंगामात बोगद्याचे काम करणे शक्य नव्हते. डोंगरावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांमुळे बांधकामात व्यत्यय येत होता. भोगद्याच्या निर्मितीत कोरोना संसर्गाचे विघ्नही आले होते. गेल्या पावसाळ्यात बोगद्याच्या एका बाजूला मातीचे ढीगारे कोसळले होते. त्यामुळे बोगदा साकारण्यासाठी तब्बल आठ वर्षांची प्रतीक्षा करावी लागले. दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.