नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येथे आज मंगळवारी ‘रोजगार मेळय़ा’चे आयोजन करण्यात आले असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 71 हजार नवनियुक्त कर्मचाऱयांना नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी या नवनियुक्त कर्मचाऱयांना संबोधून व्हिडीओs कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण करणार आहेत.
रोजगारनिर्मितीला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे केंद्र सरकारचे धोरण असून पंतप्रधान मोदी यांनी कामी पुढाकार घेतला आहे. रोजगार मेळा हे या ध्येयाच्या पूर्तीच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. देशातील तरुणांना अर्थपूर्ण आणि त्यांच्या कौशल्याचा उपयोग होईल अशा प्रकारे रोजगार देणे हे याकडे केंद्र सरकारचे लक्ष असून यातून युवकांचे सबलीकरण होणार आहे. तसेच राष्ट्रउभारणीच्या कार्यात युवकांचे महत्वपूर्ण योगदान असेल या दृष्टीने रोजगार निर्मितीचे स्वरुप ठरविण्यात आले असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
45 स्थानी वितरण
नवनियुक्त कर्मचाऱयांना देशात 45 स्थानांमध्ये नियुक्ती पत्रे प्रदान केली जातील. मात्र, या स्थानांमध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील कोणत्याही स्थानाचा समावेश असणार नाही. कारण या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया होत असून त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. याआधी दिलेल्या नियुक्तीपत्रांशिवाय ही अतिरिक्त नियुक्तीपत्रे असतील. आता नोकरी देण्यात आलेल्या कर्मचाऱयांमध्ये शिक्षक, प्राध्यापक, परिचारिका (नर्सेस), नर्सिंग अधिकारी, डॉक्टर्स, फार्मासिस्टस्, पॅरामेडिकल कर्मचारी, रेडिओग्राफर्स आदी पदांचा समावेश आहे. याशिवाय केंद्रीय गृह विभागाकडूनही हजारो नियुक्तीपत्रे या पुढच्या काळात देण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
कर्मचाऱयांसाठी अभ्यासक्रम
नवानियुक्त कर्मचाऱयांसाठी ऑन लाईन अभ्याक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमात कर्मचाऱयांसाठीची आदर्श आचारसंहिता, कार्यस्थान आचारसंहिता (वर्कप्लेस एथिक्स) आणि कार्यनिष्ठा यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच केंद्र सरकारची मानव संसाधन धोरणे, कर्मचाऱयांना मिळणारे वेतन, भत्ते आणि इतर लाभ इत्यादींची माहिती त्यांना दिली जाणार आहे.