अमेरिकेकडून होणार खरेदी : सैन्याचे बळ वाढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत तणावादरम्यान संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) 2,290 कोटी रुपयांच्या करारांना मंजुरी दिली आहे. यात सैन्यासाठी रायफल्स खरेदीचा मुद्दा सामील आहे. या कराराच्या अंतर्गत सैन्यासाठी आणखीन 72 हजार अमेरिकन सिंग सॉर असॉल्ट रायफल्स खरेदी केल्या जाणार आहेत. हे आधुनिक असॉल्ट रायफल आहे.
या असॉल्ट रायफलची बॅरल 16 इंच असून कॅलिबर 7.22 एमएम आहे. तर डीएसीने अधिग्रहणाच्या नव्या धोरणालाही मंजुरी दिली आहे. यानुसार आंतरशासकीय करार, शासन-शासन करार आणि एकच विक्रेता असल्यासही ऑफसेट लागू होणार नाही.
भारतीय वर्गवारी अंतर्गत 540 कोटी रुपयांच्या अनुमानित खर्चाने स्टॅटिक एसएफ ट्रान्स रिसिव्हर सेट आणि स्मार्ट अँटी एअरफिल्ड शस्त्रास्त्राला डीएसीने मान्यता दिली आहे. एचएफ रेडिओ सेट सैन्य आणि वायुदलाच्या फील्ड शाखांसाठी उत्तम दूरसंचार सक्षम करणार आहे. याचबरोबर 970 कोटी रुपयांच्या अनुमानित रकमेच्या अंतर्गत खरेदी केल्या जाणाऱया स्मार्ट अँटी एअरफिल्ड शस्त्रास्त्रांना नौदल आणि वायुदलाच्या अग्निशक्तीत जोडण्यात येणार आहे.
तर शत्रूला सर्वच आघाडय़ांवर चोख प्रत्युत्तर देता यावे याकरता सैन्यासाठी 780 कोटी रुपयांद्वारे 72 हजार अमेरिकन सिंग सॉर असॉल्ट रायफल्स खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.