वन खात्याकडून मिळाली रितसर मंजूरी : तिप्पटीने नवीन झाडे लावण्याचा आदेश
प्रतिनिधी /पणजी
मोपा विमानतळासाठी निश्चित केलेल्या मोपा लिंक रोडकरीता 7218 झाडे कापण्यास वनखात्याने मान्यता दिल्याचे समोर आले आहे. त्यासाठी वनखात्याने लेखी आदेश जारी केला आहे.
धारगळ येथील 3258, वारखंड येथील 2698 तर कासारवर्णे येथील 1342 झाडे कापण्यात येणार आहेत. ही झाडे नेमकी कसली आहेत याचा उल्लेख मात्र आदेशात करण्यात आलेला नाही. या परवान्यामुळे झाडांच्या कत्तलीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता दिसून येत आहे.
तिप्पटीने नवी झाडे लाण्याचा आदेश
ही झाडे कापल्यानंतर संपादीत जागेत पावसाळ्य़ापूर्वी 21654 नवीन झाडे लावण्याचे निर्देश झाडे कापणाऱया एजन्सीला देण्यात आले आहेत. आता पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून ती नवीन झाडे लावली की नाहीत याकडे कोण लक्ष देणार याचा खुलासा आदेशातून करण्यात आलेला नाही.
झाडांच्या कत्तलीचा विरोध मावळला
मोपा विमानतळासाठी तसेच मोपाकडे जाणाऱया लिंक रोडसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून झाडांची कत्तल सुरु असून ती कत्तल रोखण्यासाठी स्थानिकांचे गेले काही दिवस आंदोलनही सुरु होते परंतु ते पोलीस बळाचा वापर करुन चिरडून टाकण्यात आले. त्यामुळे कत्तलीसाठी होणारा विरोध मावळला असून वन खात्याने अर्थात सरकारने अधिकृत आदेश काढल्यामुळे झाडांच्या कत्तलीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अनेक स्थानिक लोकांची बागायती, फळझाडे या भागात असून ती आता नष्ट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारनेच झाडांच्या कत्तलीसाठी अधिकृत मान्यता दिल्याने ती आता कोणी राखू शकत नाही, अशी वस्तुस्थिती असल्याचे समोर आले आहे.