वंदूर : प्रतिनिधी
प्रखर देशभक्ती असलेल्या ‘शिलेदार संस्थेच्या’ गिर्यारोहकांनी देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनी पुणे जिल्ह्यातील जाभिंवली, कामशेत पासुन काही अंतरावर असलेल्या कळकराई सुळका आणि ढाक किल्ला यांच्या मधील दरीमध्ये 73 फुट भारतीय तिरंगा ध्वज फडकवून एक अनोखा विक्रम केला आहे. गिर्यारोहकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सह्याद्रीच्या दाट जंगलात ढाक किल्ल्याजवळ असलेला कळकराई हा अतिशय दुर्गम व १८० फुटांपेक्षा अधीक उंचीचा हा सुळका कठीण आहे. जाग्यावरच तीव्र उंच असलेला सुळका, त्यात खडकाळ भुभागावरील निसरडी वाट असलेला दुर्गम असा कळकराई सुळका चढाईस अवघड आहे. 73 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी कळकराई सुळका आणि ढाक किल्ला यांच्या मधील दरीमध्ये 73 फुट तिरंगा फडकावयचा असा दृढनिश्चय शिलेदार संस्थेच्या गिर्यारोहकांनी केला, आणि या खडतर मोहिमेची आखणी संस्थेने केली.
संस्थेचे गिर्यारोहक सागर नलवडे यांच्या नेतृत्वाखाली टिमने दिनांक 25 जानेवारी रोजी सुळक्या जवळच्या जाभिंवली गावात मुक्काम करुन दुस-या दिवशी पहाटे पाच वाजता मोहिमेची सुरवात केली. घनदाट जंगल व अरुंद वाट, घसरण असलेल्या वाटेतुन मार्गस्थ होत, एकमेकांचा आधार बनत कळकराई बेसला पोहचले आणि गिर्यारोहणाची सर्व तयारी करुन सुळका सर केला.
73 व्या भारतीय प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत 73 फुट तिरंगा दिमाखात फडकवला. एक वेगळी देशप्रेमाची ओळख यामुळे गिर्यारोहण क्षेत्रात झाली आहे. शिलेदार संस्थेचे गिर्यारोहक सागर नलावडे, सागर गोरुले, प्रितम चौगुले, महेश तेरदाळे, अनिकेत जाधव, मोनिष येनपुरे, कविता बोटले, समिर चाळके, प्रितेश गुडेकर, रजनीकांत जाधव, अमोल मुसळे या धाडशी मोहिमेत सहभागी झाले होते.