170 महाविद्यालयांकडून प्रवेश घेण्याचे आमंत्रण
हायस्कूलपासून ग्रॅज्युएशनपर्यंतचा प्रवास सोपा नसतो. अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या ड्रीम कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या ‘ड्रीम कॉलेज’मध्ये प्रवेश मिळत नाही. कॉलेजमध्ये प्रवश घेण्यादरम्यान अनेक विद्यार्थ्यांची झोपच उडालेली असते.
तर दुसरीकडे डेनिस मलिक बार्न्स या विद्यार्थ्याला अशी कुठलीच चिंता नाही. लुइसियाना हायस्कुल सीनियरचा 16 वर्षीय विद्यार्थी डेनिस बार्न्सला आतापर्यंत जगातील कमीतकमी 170 कॉलेजांकडून प्रवेशासाठी आमंत्रण मिळाले आहे. याचबरोबर त्याला 9 दशलक्ष डॉलर्सची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
बार्न्स जगातील अधिकाधिक महाविद्यालयांमध्ये अर्ज करू पाहत होता. ऑगस्ट 2022 मध्ये त्याने कॉलेजांमध्ये अर्ज करण्यास सुरुवात केली होती. स्वतःचा अर्ज नाकारला जाणार नसल्याची त्याला खात्री होती. जसजसे मी अधिकाधिक कॉलेजांमध्ये अर्ज करू लागलो, वित्तीय सहाय्य आणि विद्यापीठांच्या होकारासोबत मी अंतर्मूख होत गेलो असे बार्न्सने सांगितले आहे. बार्न्सच्या स्कूल प्रशासकांनी आता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सशी संपर्क साधला आहे. बार्न्सच्या कामगिरीने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बार्न्स 4.98 च्या जीपीएसोबत दोन वर्षांपूर्वीच ग्रॅज्युएशन करत आहे.
बार्न्सच्या कामगिरीवर गर्व असल्याचे सांगत स्कूल प्रशासनाने या विक्रमाची नोंद करण्यासाठी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सशी संपर्क साधला आहे. जर तुम्ही स्वतःची शाळा, शिक्षणाला प्राथमिकता देत असाल आणि देवावर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल असे बार्न्सने म्हटले आहे.