आरोग्यमंत्र्यांसह पंतप्रधानांनी देशवासियांचे केले अभिनंदन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील 75 टक्के प्रौढ व्यक्तींना लसीकरणाचे दोन्ही डोस मिळाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी दिली. तसेच कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण अधिक बळकट होत आहोत, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी देशवासियांचे अभिनंदन केले. 75 टक्के प्रौढ लोकसंख्येला संपूर्ण लसीकरण झाल्याच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल सर्व जनतेचे अभिनंदन. देशातील लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱया सर्वांचा मला अभिमान आहे’ असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
आतापर्यंत देशातील एकूण लसीकरणांची संख्या 165 कोटी 70 लाख 60 हजार 692 वर पोहोचली आहे. यावर आनंद व्यक्त करताना आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ‘सबका साथ, सबका प्रयास’ या मंत्राने, भारताने आपल्या 75 टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देण्याचे ध्येय गाठल्याचे स्पष्ट केले. तसेच कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधक नियमांचे पालन करावे आणि लवकरात लवकर लस घ्यावी, असेही आवाहन केले. यापुढेही संपूर्ण जगभरात दहशत निर्माण करणाऱया कोरोनाविरोधी लढाई सुरूच राहील. हा लढा अधिक बळकट करण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात 24 तासात 893 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 281 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान 3 लाख 52 हजार 784 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 18 लाख 84 हजार 937 झाली आहे. देशातील दैनंदिन सकारात्मकता दर आता 14.50 टक्क्मयांवर आला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 10 लाख 92 हजार 522 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच कोरोनामुळे जीव गमावणाऱयांची संख्या 4 लाख 94 हजार 91 झाली आहे. तसेच आतापर्यंत 3 कोटी 87 लाख 13 हजार 494 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.