चीनसोबतच्या तणावाची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चीनसोबत वाढत्या तणावादरम्यान 2022 साठी 768.2 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात हिंद-प्रशांत क्षेत्रात मोहीम राबविण्यासाठीच केवळ 7.1 अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली. तसेच चीनविरोधात एक ‘मोठी रणनीति’ तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात चीन आणि रशियासोबतच्या वाढत्या प्रतिस्पर्धेवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच स्वनातीत शस्त्रास्त्रs, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, 5जी, क्वांटम कॉम्प्युटिंग यासारख्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांवर जोर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात हिंद-प्रशांत क्षेत्रात मोहिमेसाठी 7.1 अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे. याच क्षेत्रात चीनकडून अरेरावी करण्यात येत आहे. दक्षिण चीन समुद्रात चीन आणि तैवान यांच्यात युद्धसदृश स्थिती निर्माण होताना दिसून येतेय.
अमेरिकेच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकरण अधिनियमावर (एनडीएए) सोमवारी स्वाक्षरी करत त्याला कायद्याचे स्वरुप दिले. या कायद्याच्या अंतर्गत संरक्षण प्रकलपांवर खर्चासाठी 768.2 डॉलर्सची रक्कम अधिकृत करण्यात आली आहे.