वार्ताहर /सावईवेरे
शिरगांव येथील श्री लईराई देवीचा प्रसिद्ध जत्रोत्सव गुरुवार 5 रोजी साजरा होणार असून जत्रोत्सवातील अग्नीदिव्यासाठी सावईवेरे भागातील धोंडगण सज्ज झाले आहेत. या भागातील साधारण सत्तर धोंडगणांनी सावईवेरे येथील श्री सातेरी देवस्थानच्या प्राकारात रविवारपासून सामुहिक व्रत सुरु केले आहे.
ज्येष्ठ धोंडगणांबरोबरच युवा व महिलांचाही त्यात सहभाग आहे. जत्रोत्सवकाळात गेली 77 वर्षे श्री सातेरी देवस्थानच्या प्रांगणात सावईवेरेतील धोंडगणांचे हे व्रत व सोवळे ओवळे सुरु असते. मध्यंतरी दोन वर्षे कोरोनामुळे त्यात खंड पडला होता. या धोंडगणांकडून गेल्या तीन दिवसापासून सातेरी देवस्थानच्या प्रांगणात मंडप उभारुन सामुहिकरित्या व्रत सुरु आहे. येथील गुरुदास कडेकर हे गेल्या अनेक वर्षापासून धोंडगणांच्या आंघोळीसाठी व भोजनासाठी मोफत पाण्याची सोय करीत आहेत. जत्रोत्सव सुरु होण्याच्या महिन्याभरापूर्वी म्हणजेच गुढीपाडव्यापासून लईराईच्या धोंडगणातर्फे व्रत पाळले जाते. जत्रोत्सवाच्या चार दिवस आधी व्रत अत्यंत कडकपणे पाळण्यास सुरुवात होते. भोजनापूर्वी आंघोळ व ओल्या अंगाने भोजनादी कार्यक्रम उरकले जातात. या चार दिवसात सामुहिक व्रत व भोजन केले जाते. गुरुवारी दुपारी सर्व धोंडगण धोतर, उपरणे नेसून व कमरेला रंगीत शेला बांधून तसेच हातात व गळय़ात फुलांच्या माळा घालून सजविलेली वेताची काठी घेत श्री शांतादुर्गा, लईराई व अनंत देवाचा जयघोष करीत शिरगावकडे प्रयाण करणार आहेत.