प्रतिनिधी / शाहुवाडी
पेरीड गावच्या जंगल हद्दीमध्ये मध्यरात्री परिमंडल वनाधिकारी संजय कांबळे व राजाराम राजीगरे वनरक्षक तसेच दिनकर पाटील, सर्जेराव पवार, राम केसरे वन मजूर हे रात्री अडीच वाजता गस्त घालत होते. त्यावेळी रात्री चांदण्याच्या प्रकाशात कमांडर जीप बिना लाइट लावता खैर वृक्षाची कत्तल करुण लाकडे भरताना गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. यावेळी या कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला. यावेळी वसंत पाटील रा. पेरीड या इसमाने वनरक्षक राजाराम राजीगरे या कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला व सिनेस्टाईलने दगडावरून कमांडर जीप उडवून भगवान सावंत रा. शिरगाव व एक अनोळखी चेहरा बांधलेल्या इसमासह, रात्रीच्या अंधारात फरार झाले.
घटनास्थळी कर्मचाऱ्यांना खैर जातीची लाकडे व एक मोटारसायकल आढळून आली असून मलकापूर परिक्षेत्र वन अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी यावेळी फरारी इसमांच्या घरी छापा मारला असता, पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमालासह घराच्या परिसरात खैर झाडाची लाकडी 15 पोती, वृक्षतोडीसाठी चे सर्व प्रकारचे साहित्य तसेच लाकूड कटर मशीन व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. याबाबत मलकापूर परिक्षेत्र वन अधिकारी नंदकुमार नलवडे अधिक तपास करीत असून शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. सदरच्या घटनेने संपूर्ण शाहुवाडी तालुक्यांमध्ये खळबळ माजली आहे.