वृत्तसंस्था/ लंडन
कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्र संपूर्णपणे ठप्प झाले असून त्याला क्रिकेटही अपवाद नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रिकेट स्पर्धा लांबणीवर किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. इंग्लंडला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते पण कोव्हिड-19 संकटामुळे इंग्लंडमधील सर्व राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत.
इंग्लंडमध्ये प्रेक्षकविना मोकळय़ा स्टेडियममध्ये क्रिकेटचे सामने खेळविले गेले तरीही या क्रीडाप्रकारातील चुरस कमी राहणार नाही, असे प्रतिपादन इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हा प्रकार आता टी.व्हीवर पाहावयास मिळू शकेल कारण कोरोनाचा प्रसार अधिक असल्याने प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्बंध राहील. विंडीजचा संघ इंग्लंडमध्ये मालिका खेळण्यासाठी येणार आहे.
या मालिकेतील सामने मोकळय़ा स्टेडियममध्ये खेळविले गेले तर या खेळाचे खरे आकर्षण नष्ट होईल, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाला वाटते. काही समस्येमुळे क्वचित प्रेक्षकविना सामने खेळविले जावू शकतात पण याची वारंवार पुनरावृत्ती होवू शकत नाही, असे स्टोक्सने बीबीसीच्या नभोवाणीशी बोलताना सांगितले.