मध्यप्रदेशातील घटना – मिशनरी स्कूल सापडले वादात
वृत्तसंस्था/ विदिशा
मध्यप्रदेशच्या विदिशामधील एका मिशनरी स्कुलमध्ये मोठा गदारोळ झाला आहे. शाळा व्यवस्थापनावर 8 मुलांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्याचा आरोप झाला आहे. या कथित धर्मांतराच्या विरोधात शाळेत तोडफोड करण्यात आली तसेच दगडफेकही झाली आहे. विदिशा जिल्हय़ातील गंजबासौदा शहराच्या सेंट जोसेफ स्कुलमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला आहे. शाळेत धर्मांतर करविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लहान मुलांना आमिषं दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात येत असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. संतप्त संघटनांनी शाळा व्यवस्थापनारव कारवाई करण्याच्या मागणीवरून एक निवेदनही दिले आहे. या शाळेत 8 मुलांचे कथित धर्मांतर करविण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. लोकांमधील संताप पाहता प्रशासनाकडून शहरातील स्थानिक प्रार्थनास्थळ आणि अन्य मिशनरी शाळांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले.
प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱयांनी तेथे धाव घेतली. याप्रकरणी कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. सध्या चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक मोनिका शुक्ला यांनी सांगितले आहे.
सोशल मीडियावर धर्मांतराची चर्चा
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका मिशनरी स्कुलमध्ये मुलांचे धर्मांतर करविण्यात आल्याची चर्चा सुरू होती. गंजबासौदा येथील या शाळेचे नाव यात प्रामुख्याने घेतले जात होते. सोशल मीडियावर एक छायाचित्रही पोस्ट करण्यात आले ,ज्यात मुलांवर पाणी शिंपडून त्यांचे धर्मांतर करविण्यात आल्याचा दावा केला गेला.