एका रात्रीच्या वास्तव्यासाठी द्यावे लागते किरकोळ रक्कम
जगात अशी अनेक हॉटेल्स आणि रिजॉर्ट आहेत, जी स्वतःच्या सुंदरतेमुळे अत्यंत लोकप्रिय आहेत. अनेकदा या हॉटेल्सची निर्मिती मौल्यवान सामग्रीद्वारे केली जाते, जी विदेशातून मागविण्यात येते. पण एक हॉटेल इटालिन मार्बल किंवा कोटय़वधींच्या गुंतवणुकीतून नव्हे तर प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचऱयांपासून तयार झाले आहे.
आफ्रिकेच्या आइव्हरी कोस्टमध्ये एक रिजॉर्ट जगभरात अत्यंत लोकप्रिय आहे. समुद्र किनाऱयावर निर्माण करण्यात आलेले हे रिजॉर्ट पहायला सर्वसाधारण वाटते, पण याचे वैशिष्टय़ जाणून घेतल्यावर सर्वजण दंग होतात. अबिदजान शहरातील लिले फ्लोट्टानंटे रिजॉर्ट 8 लाखांहून अधिक प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या कचऱयावर तरंगत आहे. हे रिजॉर्ट एका बेटासारखे असून जे प्लास्टिकच्या टाकाऊ सामग्रीचा वापर करत तयार करण्यात आले आहे.


200 टन वजन
प्रेंच उद्योजक एरिक बेकर यांना शहराच्या या किनाऱयावर प्लास्टिकचा कचरा दिसल्यावर ही कल्पना सुचली होती. या आयलँड रिजॉर्टचे एकूण वजन 200 टनाच्या आसपास आहे. हे रिजॉर्ट किनाऱयानजीक कमी खोली असलेल्या पाण्यात उभारण्यात आले आहे. आयलँडवर एक हॉटेल असून त्यात राहण्यासाठी खोल्या आहेत, तर रेस्टॉरंट, कराओके बार तसेच दोन स्वीमिंग पूल आहेत.
7 हजार रुपयांचे शुल्क
आयलँडवर एक रात्र वास्तव्यासाठी असणारे शुल्क अन्य रिजॉर्टच्या तुलनेत खूपच कमी आहे. येथे एका रात्रीच्या वास्तव्याकरता 7 हजार रुपये खर्च करावे लागतात. दिवसा या रिजॉर्टमध्ये येण्यासाठी 1800 रुपये द्यावे लागतात. या रिजॉर्टवर एका आठवडय़ात 100 हून अधिक पर्यटक येतात, यात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. रिजॉर्टवर सौरऊर्जेद्वारे वीज मिळते, तर शहरानजीक असल्याने स्वच्छ पाण्याचाही पुरवठा होतो. हे पूर्ण बेट पर्यावरणस्नेही आहे.