Tarun Bharat

8 हजार जम्बो जेट्सची आवश्यकता

Advertisements

कोरोना लस मोहीम 2 वर्षे चालणार : जगाची लोकसंख्या 7 अब्जाहून अधिक

कोरोनावरील लस मंजूर झाल्यावर जगाच्या 7 अब्ज लोकसंख्येपर्यंत ती पोहोचविणे सोपे ठरणार नाही. लस वितरणाचे अत्यंत मोठे आव्हान पूर्ण करण्यासाठी 110 टन क्षमता असलेल्या जम्बो जेट्सच्या 8 हजार फेऱयांची गरज भासणार आहे. 14 अब्ज डोस सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही मोहीम दोन वर्षे चालणार आहे. लसीच्या वितरणासाठी विमानासह कार, बस, ट्रक आणि दुचाकी तसेच सायकलचीही मदत घ्यावी लागणार आहे. काही भागांमध्ये तर पायपीट करून लस पोहोचवावी लागेल.

110 टन क्षमता असणाऱया बोइंग-747 विमानांनी 8 हजार फेऱया मारल्यावरच लस सर्वांपर्यंत पोहोचू शकेल. याचबरोबर तापमान नियंत्रण आणि अन्य बाबींची विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. विशेषकरून फायजरच्या लसीकरता या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील. ब्रिटन आणि अमेरिकेसह युरोपीय महासंघाच्या अन्य देशांमध्ये या लसीला सर्वप्रथम मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याचे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने म्हटले आहे. फायजरची लस सुरक्षित आणि प्रभावी ठेवण्यासाठी उणे 70 अंश तापमानात ठेवावी लागणार आहे. हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात गुंतागुतींचा परिवहन कार्यक्रम ठरणार असल्याचे उद्गार आयएटीएचे प्रमुख अलेक्जांद्रे डी जुनियाक यांनी काढले आहेत.

लुफ्थांसा एप्रिलमध्येच सक्रीय

जगातील सर्वात मोठय़ा कार्गो कॅरियर्सपैकी एक लुफ्थांसाने एप्रिलमध्येच लसवितरणाच्या योजनेवर काम सुरू केले होते. 20 जणांचे कृतिदल तयार करून मॉडर्ना, फायजर किंवा एस्ट्राजेनेकाची लस जगातील कानाकोपऱयात पोहोचविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. एअरलाइन्सच्या 15 बोइंग 777 आणि एमडी-11 मालवाहू विमानांमध्ये जागा कशी निर्माण करावी तसेच 25 टक्के क्षमतेसह उड्डाण करणाऱया प्रवासी विमानांच्या ताफ्यात कोणते बदल करावेत हे प्रश्न कृतिदलासमोर होते. लसीची वाहतूक करणे माउंट एव्हरेस्ट सर करण्यापेक्षाही अधिक आव्हानात्मक आहे. महिन्यांच्या मेहनतीनंतर लस निर्माण करणे म्हणजे केवळ एव्हरेस्टच्या पायथ्याशी पोहोचणे असल्याचे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेचे इम्युनायजेशन प्रमुख कॅथरीन ओ ब्रायन यांनी काढले आहेत.

लॉजिस्टिक्समधील 4 आव्हाने

कार्गो क्षमता : सद्यकाळात 2 हजार मालवाहू विमानांचा वापर होतोय. जगातील निम्मी हवाई मालवाहतूक त्यांच्याच माध्यमातून होते. उर्वरित सामग्री 22,00 नियमित विमानांद्वारे पोहोचविली जाते. मालवाहू विमाने कार्यरत असली तरीही नियमित विमानांमुळे त्यांची हिस्सेदारी कमी झाली आहे.

डीप फ्रीज : फायजर-बायोएनटेकच्या लसीला उणे 70 अंश सेल्सिअसवर ठेवावे लागणार आहे. हे अंटार्क्टिकातील हिवाळय़ापेक्षाही कमी तापमान आहे. कंपन्यांनी जीपीएसयुक्त थर्मल सेन्सरचा वापर करण्याची योजना आखली आहे. लसीला जमिनीवर अल्ट्रा-लो तापमानाच्या फ्रीजर्समध्ये ठेवावे लागणार आहे. सध्या कुठल्याही विमानात अशाप्रकारची शीतयंत्रणा नाही.

साठवणूक : लसीची साठवणूक करणेही मोठे आव्हान आहे. मोठय़ा महानगरांमध्ये डीप-फ्रीज क्षमता आहे. युनायटेड पार्सल सर्व्हिसेसकडे एकूण 600 डीप फ्रीजर असून तेथे उणे 80 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानावर लसीचे 48000 डोस ठेवले जाऊ शकतात. फेडएक्स कॉर्पने स्वतःच्या कोल्डचेन नेटवर्कमध्ये फ्रीजर्स आणि रेफ्रिजरेटेड ट्रक्सची संख्या वाढविली आहे. गरिबांपर्यंत लस पोहोचविणे : निर्मिती केंद्रातून कुठलेही मोठे रुग्णालय किंवा शहरात लसीचे डोस पोहोचविणे सोपे आहे, परंतु विकसनशील आणि गरीब देशांमध्ये हे कार्य अत्यंत अवघड आहे. गावे आणि छोटय़ा शहरांमध्ये पायाभूत सुविधा नसल्यातच जमा आहे. युनिसेफने नोव्हेंबरमध्येच 40 कॅरियर्सना जगातील 92 सर्वात गरीब देशांपर्यंत लस पोहोचविण्याची योजना सादर करण्यास सांगितले आहे. जगातील 70 टक्के लोकसंख्येला लसीच्या कक्षेत आणण्याचा युनिसेफचा प्रयत्न आहे.

Related Stories

नेपाळमधील राजकीय संकट चिघळले

Patil_p

नेपाळमध्ये पूर, 3 भारतीयांसह 20 बेपत्ता

Amit Kulkarni

तालिबानकडून सरकार स्थापनेची घोषणा

datta jadhav

जगभरात 2.50 कोटींहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

यंत्रसामग्री देंण्यास चीनची टाळाटाळ

Patil_p

दाऊद इब्राहिमला पाकचा आश्रय

Patil_p
error: Content is protected !!