पुणे / वार्ताहर :
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला न्यूड फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन आभासी चलनातील खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम व्यावसायिकाकाडे खंडणी स्वरुपात 60 बिटकॉईन मागितले आहेत. 60 बिटकॉईनची किंमत आठ कोटी 30 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत एका बांधकाम व्यावसायिक कंपनीतील अधिकारी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ईमेलद्वारे खंडणी मागणाऱ्या चोरटय़ाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे दिल्लीतील नेतृत्वाचे कारस्थान; नाना पटोलेंचा आरोप
तक्रारदार महिला बांधकाम व्यावयायिक कंपनीत विपणन अधिकारी आहेत. गेल्या आठवडय़ात बांधकाम कंपनीच्या इमेल खात्यावर अज्ञाताने इमेल पाठविला. इमेल करणाऱ्या आरोपीने कंपनीच्या अध्यक्षांचे न्यूड फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. न्यूड फोटो प्रसारित करत नाही. बदनामीला सामोरे जायचे नसेल तर 60 बिटकॉईन खंडणी स्वरुपात द्यावे लागतील, अशी धमकी आरोपीने इमेलद्वारे दिली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. सायबर पोलिसांनी तक्रार अर्जाची पाहणी केली. संबंधित गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम. बी. जाधव तपास करत आहेत.