चंदीगढ / वृत्तसंस्था
सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे. मारेकऱयांना साधनसामग्री पुरविणे आणि आश्रय देणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात येतील असे समजते. 29 मे या दिवशी ही हत्या झाली होती. मुसेवाला हे लोकप्रिय गायक होते. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संदीप सिंग ऊर्फ केकडा (सिरसा), मनप्रीत सिंग ऊफऊ माना (भटिंडा), मनप्रीत भाऊ (धालपल), सराज मिंटू (अमृतसर), प्रवणदीप सिद्धू ऊर्फ पब्बी (तकहाट माली), मोनू डागर (सोनेपत), पवन बिष्णोई आणि नसीब (फरीदाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे असून प्रत्येकाचा या हत्येत भिन्न भिन्न प्रकारे सहभाग आहे, असे पंजाब पोलिसांचे म्हणणे असून आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.
सातत्याने माहिती पाठविली
संदीप ऊर्फ केकडा याने गोल्डी ब्रार आणि सचिन थापन यांच्या आदेशावरुन मुसेवाला यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्याने आपण मुसेवाला यांचा चाहता असल्याचे भासविले होते आणि त्यामुळे तो मुसेवाला यांच्या जवळ त्याचा वावर होता. केकडा याने मुसेवाला यांच्या जवळ जाऊन त्यांची छायाचित्रे आणि सेल्फी घेऊन ती मारेकऱयांना पाठीवल्याचेही तपासातून स्पष्ट झाल्याची माहिती दिली गेली. मुसेवाला यांच्या अवती भोवती पोलिस संरक्षण अत्यंत कमी प्रमाणात आहे, असा संदेशही त्याने मारेकऱयांना पाठविला होता. त्यामुळेच या गायकाचे नेमके स्थान मारेकऱयांना समजले आणि ते हत्या करण्यात यशस्वी झाले.
माना याने कार पुरविली मनप्रीत सिंग याने मारेकऱयांना टोयोटा कार पुरविली होती. ती त्याने नंतर मनप्रीत भाऊ याला दिली. त्यानंतर ती संशयित मारेकऱयांना दिली गेली. याच कारमधून मारेकरी मुसेवाला यांच्या जवळ आले आणि त्यांनी जवळून गोळय़ा घालून हत्या केली. ही हत्या सराज मिंटू याच्या सांगण्यावरुन झाली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गुन्हय़ाशी संबंधित सर्वांना अटक केल्यानंतरच सर्व बाबींचा उलगडा होईल. हत्येचे कारणही स्पष्ट होईल, अशी पोलिसांची भूमिका आहे.