बाराबंकी
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे सोमवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. पूर्वांचल द्रुतगती मार्गावर उभ्या असलेल्या एका डबलडेकर बसला मागून येणाऱया दुसऱया डबलडेकर बसने जोरदार धडक दिली. यामध्ये 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 18 जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचाही समावेश आहे. लोणीकत्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रपूर मद्राहा गावाजवळ हा अपघात झाला. दोन्ही बस बिहारहून दिल्लीला जात होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जखमींना बाराबंकी येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर लखनौ ट्रॉमा सेंटरमध्ये अधिक उपचारार्थ पाठवण्यात आले. बस अपघातावेळी सुदैवाने, पार्क केलेल्या बसमधील बहुतेक प्रवासी चहा-नाश्त्यासाठी खाली उतरल्यामुळे जीवितहानीचा आकडा नियंत्रणात राहिला. अन्यथा अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकला असता, अशी माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली.