अमेरिका-ब्रिटन-ऑस्ट्रेलियाची भागीदारी ः चीनच्या कोंडीसाठी 20.19 लाख कोटींचा करार
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांची भेट घेतली आहे. ऑकस अंतर्गत झालेल्या बैठकीत 2030 पर्यंत ऑस्ट्रेलियाला आण्विक ऊर्जायुक्त पाणबुडी पुरविण्याचा करार झाला आहे. हा करार हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.
या कराराच्या अंतर्गत अमेरिका ऑस्ट्रेलियाला 3 युएस वर्जीनिया क्लास न्युक्लियर पॉवर्ड सबमरीन्स पुरविणार आहे. तर गरज भासल्यास आणखी 2 पाणबुडय़ा प्रदान केल्या जाणार आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया मिळून 8 एसएसएन-ऑकस पाणबुडय़ांची निर्मिती होणार असून यात अमेरिकेच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या सैनिकांना मिळणार प्रशिक्षण
तिन्ही देशांच्या भागीदारी अंतर्गत निर्मित एसएसएन-ऑकस पाणबुडी ब्रिटनला 2030 च्या अखेरपर्यंत प्राप्त होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाला ही पाणबुडी 2040 च्या प्रारंभी मिळणार आहे. बीएई आणि रोल्स-रॉयस या कंपन्यांकडून याची निर्मिती होणार आहे. या पाणबुडय़ांच्या प्रकल्पाकरता 245 अब्ज डॉलर्सचा (20.19 लाख कोटी रुपये) खर्च येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या नौदलाला प्रशिक्षण देण्यासाठी 2027 पर्यंत अमेरिकेच्या 4 तर ब्रिटनची एक पाणबुडी पश्चिम ऑस्ट्रेलियात तैनात केली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाला पुरविणार तंत्रज्ञान
या पाणबुडय़ांवर अण्वस्त्र नसतील असे बिडेन यांनी सातत्याने स्पष्ट केले. 1950 नंतर पहिल्यांदाच अमेरिका स्वतःचे आण्विक तंत्रज्ञान कुठल्याही देशाला पुरविणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याला एक मजबूत भागीदारी ठरवत अटलांटिक आणि प्रशांत महासागरात पाणबुडय़ांचे 3 ताफे एकाचवेळी शांतता राखण्यासाठी काम करतील असे म्हटले आहे.
वाढत्या आव्हानांदरम्यान भागीदारी आवश्यक
आम्ही ज्या आव्हानांना सामोरे जात आहोत ती सातत्याने वाढत आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केला, तर चीनच्या हालचाली देखील वाढत आहेत. दुसरीकडे इराण आणि उत्तर कोरिया अशांतता फैलावण्याचे काम करत आहेत. अशा स्थितीत जगावर अस्थिरता आणि विभाजनाचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. यादरम्यान आम्ही आमच्या देशांसोबत मिळून मजबूत भागीदारी निर्माण करणे आवश्यक असल्याचे सुनक यांनी म्हटले आहे.
चीनकडून निंदा
याचदरम्यान चीनने ऑकस कराराला अवैध ठरवत याची निंदा केली आहे. या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने फ्रान्ससोबतचा पाणबुडीचा करार रद्द केला आहे. यावरून फ्रान्सही नाराज झाला आहे. चीनची भूमिका हा चिंतेचा विषय नाही. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी मी लवकरच बोलणार असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.