बांद्यात शोरुमला शॉर्टसर्किटने भीषण आग : सोफ्यावर ठिणगी पडून आग पसरली
तिसऱया मजल्यावर अडकलेल्या दोन मुलांची सुटका
प्रतिनिधी / बांदा:
येथील बाजारपेठेतील महालक्ष्मी स्टील सेंटरचे मालक तथा उद्योजक प्रवीण व भूषण श्रीकृष्ण शिरसाट यांच्या फर्निचर शोरुम व गोडावूनला शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत तीन मजली शोरुम जळाला. यामध्ये सोफा, लाकडी व प्लास्टिक फर्निचर, स्टील व अन्य साहित्य मिळून सुमारे 80 लाख रुपयांचे नुकसान झाले. बांदा ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दुसऱया मजल्यावर अडकलेल्या प्रवीण शिरसाट यांच्या दोन्ही मुलांना सुभाष शिरोडकर या युवकाने धाडस दाखवत शिडीच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. कुडाळ येथील बंब पाचारण करून आग विझविण्यात यश आले.
सोफ्यावर पडली ठिणगी
बांदा बाजारपेठेत शिरसाट यांच्या राहत्या घरामागे दुमजली फर्निचर शोरुम आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शोरुमच्या तळमजल्यावर अचानक शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीची ठिणगी तेथील सोफ्यावर पडली. काथ्या व स्पंज असल्याने सोफ्याने लागलीच पेट घेतला. नंतर तेथील लाकडी सामानाच्या दालनाने पेट घेतला. शोरुम बंद असल्याने सुरुवातीला आग लागल्याचे लक्षात आले नाही. या शोरुमची भिंत घराला लागूनच असल्याने भूषण शिरसाट यांना आग लागल्याचे समजले. त्यांनी तात्काळ कुटुंबियांसह धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तळमजल्यावर असलेल्या लाकडी फर्निचरने पूर्णपणे पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.
बांदावासीयांनी घेतली धाव
आगीची घटना समजताच बांदावासीयांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्याच दरम्यान बांदा शहरात वीजपुरवठा खंडित झाल्याने पंपाच्या साहाय्याने आग विझविताना अडचणी निर्माण झाल्या. उपसरपंच हर्षद कामत यांनी प्रसंगावधान राखत आतील विजेचे मुख्य कनेक्शन बंद केले.
सामानाने घेतला पेट
शिरसाट यांचे हे मुख्य शोरुम व गोडावून आहे. यामध्ये 100 टक्के मालाची दाटीवाटीने साठवणूक करण्यात आली होती. तळमजल्यावर असलेले लाकडी सोफासेट, गादी, लाकडी तावदाने, खुर्च्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण तळमजल्याला घेतले. जिन्यावरील साहित्याला भक्ष्य केले. तेथून आग पहिल्या व दुसऱया मजल्यावर पसरली. तळमजल्यावर आगीच्या ज्वाळा असल्याने आत जाणे जीवावर बेतणारे होते.
सावंतवाडीचा बंब ओरोसला
पहिल्या व दुसऱया मजल्यावर शिरसाट यांचे किमती सोफासेट, कपाटे, डायनिंग टेबल, काच, स्टील, लाकडी सामान, प्लास्टिक खुर्च्या व अन्य किमती सामान होते. हे संपूर्ण सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. क्षणार्धात दुसऱया मजल्यावर आगीने रौद्ररुप धारण केले. स्थानिकांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबासाठी कॉल केला. मात्र, येथील बंब ओरोस येथे कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याने कुडाळ येथील बंब बोलावण्यात आला. बांदा पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
कुडाळ एमआयडीसी येथील अग्निशमन बंब अडीच तासांनी घटनास्थळी दाखल झाला. मात्र, तोपर्यंत संपूर्ण इमारतीतील सामान बेचिराख झाले होते. सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, साईप्रसाद काणेकर, उपसरपंच हर्षद कामत, राजेश विरनोडकर, बाळा आकेरकर, सुभाष शिरोडकर, विशांत पांगम यांच्यासह शेकडो हात मदतीसाठी सरसावले.
सुभाष शिरोडकर यांचे धाडस
तिसऱया मजल्यावर प्रवीण शिरसाट यांचे कुटुंबीय राहतात. आग लागली त्यावेळी प्रवीण आणि त्यांची पत्नी इमारतीच्या खाली होती. तर मुलगी आदिती (18) व मुलगा ऋषी (22) हे तिसऱया मजल्यावर खोलीत अडकल्याचे कुटुंबियांनी उपस्थितांना सांगितले. मात्र, पहिल्या व दुसऱया मजल्यावर आगीचे तांडव सुरू असल्याने या दोघांना वाचविण्याचे आव्हान होते. मात्र, अशावेळी धाडस दाखवत येथील सुभाष शिरोडकर यांनी शोरुमलगत असलेल्या इमारतीच्या छपरावर चढून तेथून थेट शोरुमच्या तिसऱया मजल्याच्या खिडकीला 20 फूट लांबीची लोखंडी शिडी लावली. स्वतःचा जीव धोक्यात घालत या शिडीवरून जात त्यांनी दोन्ही मुलांना आपल्या खांद्यावर घेत सुखरुप बाहेर काढले. त्यांच्या धाडसाचे उपस्थितांनी कौतुक केले. दोन्ही मुलांना बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी सकाळी घटनास्थळी येत नुकसानीची पाहणी केली. त्यांनी 80 लाखाचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. कुडाळ येथील उशिराने दाखल झालेल्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात आली.
ग्रामस्थांनी मोठय़ा प्रमाणात मदतकार्य केले
बांद्यात मिनी बंबाची मागणी
बांदा शहरातील बाजारपेठ विस्तारत असल्याने या ठिकाणी आगीच्या छोटय़ा-मोठय़ा घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात मिनी अग्निशमन बंबाची मागणी होत होती. यासाठी ग्रामसभेत ठरावदेखील घेण्यात आला होता. कुडाळ येथील अग्निशमन बंब वेळेत न पोहोचल्याने शिरसाट यांना अधिक हानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे शहरात मिनी अग्निशमन बंबाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.